जालना : बाजारामध्ये नवीन गव्हाची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सध्या बाजारात येत असलेला गहू हा ओलावा असलेला आहे. त्याचबरोबर त्याची गुणवत्ता देखील कमी आहे. सध्या केवळ 25 टक्के गव्हाची हार्वेस्टिंग झाली आहे. तर 75 टक्के गहू हा शेतामध्ये उभा आहे. त्यामुळे बाजारात आलेला नवीन गहू आताच खरेदी करावा का? की नंतर? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. याबाबत लोकल 18 ने व्यापाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात.
advertisement
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 2000 ते 2500 क्विंटल गव्हाची आवक होत आहे. या गव्हाला 2500 ते 2850 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. सध्या नुकताच गहू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आवक देखील मर्यादित आहे. तर गव्हाची दर देखील काही प्रमाणात चढे असल्याचे पाहायला मिळतं. आगामी काळात गव्हाची आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते. त्याचबरोबर चांगल्या गुणवत्तेचा गहू बाजारात येण्यास अवधी आहे. त्यामुळे जे नागरिक थांबू शकतात त्यांनी 8 ते 10 दिवस गहू खरेदी करण्यासाठी थांबावं. मात्र ज्यांना घाई आहे ते आता देखील गव्हाची खरेदी करू शकतात.
गहू खरेदी केल्यानंतर ते योग्य प्रकारे साठवणे देखील महत्त्वाचं असतं. गहू खरेदी करतानाच योग्य प्रकारे काळजी घेणे देखील तितकच गरजेचं आहे. गहू खरेदी करताना तो व्यवस्थित वाळलेला आहे याची खात्री करावी. त्याचबरोबर गहू खरेदी केल्यानंतर त्याला एक ते दोन ऊन द्यावे. जेणेकरून गव्हामधील ओलावा पूर्णपणे नाहीसा होईल. यानंतर या गव्हाची कोठीमध्ये साठवणूक करावी. साठवणूक करताना त्याला कीड लागणार नाही. याची योग्य ती खबरदारी घ्यावी.
बाजारात सध्या नुकतीच गव्हाची आवक सुरू झाली आहे. आगामी काळामध्ये आवक वाढण्याबरोबरच दर कमी होऊ शकतात. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी स्वतःपुरत्या गव्हाची पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून गव्हाला फारशी मागणी असणार नाही. नोकरदार वर्ग मात्र बाजारातून एप्रिल, मे मध्ये गहू खरेदी करतो. आणखी 8 ते 10 दिवसांनी उत्तम गहू बाजारात येण्यास सुरुवात होईल तेव्हापासून ते मे महिन्यापर्यंत गव्हाची खरेदी केली जाऊ शकते, असं व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलं.