अमावस्या आणि गुरुवारचा योग: जर चौथ्या गुरुवारी अमावस्या येत असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. अमावस्येचा दिवस हा पितरांच्या स्मरणाचा असला तरी, गुरुवारी लक्ष्मी पूजन करण्यास कोणतीही अडचण नसते. उलट, गुरुवारी अमावस्या असल्यास महालक्ष्मीची पूजा अधिक मनोभावे करावी. केवळ अमावस्येच्या वेळी पूजा न करता, ती सकाळी शुभ मुहूर्तावर पूर्ण करावी. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की, यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे. तर निराश होऊ नका. अमावस्या ही 18 तारखेला म्हणजेच गुरुवारी नसून 19 तारखेला आहे. म्हणून तुमचे उद्यापन चुकणार नाही.
advertisement
उद्यापन करता आले नसेल तर काय करावे?: काही कारणास्तव (उदा. सुतक, आजारपण किंवा प्रवास) शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आले नाही, तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी किंवा त्यानंतरच्या पहिल्या गुरुवारी पूजा मांडून उद्यापन करता येते. श्रद्धेला महत्त्व देऊन नंतरच्या गुरुवारी देवीची ओटी भरून उद्यापन पूर्ण करावे.
तीनच गुरुवार झाले असल्यास काय करावे?: जर मार्गशीर्ष महिन्यात चारपैकी केवळ तीनच गुरुवार व्रत पूर्ण झाले असेल, तर उद्यापन आवर्जून करावे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जितके गुरुवार मनोभावे केले आहेत, त्यांचे फळ तुम्हाला मिळते. चौथा गुरुवार हुकला तरी तिसऱ्या गुरुवारी किंवा महिना संपण्यापूर्वी उद्यापन विधी पूर्ण करावा.
उद्यापन विधीची पद्धत: उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 7 सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळदी-कुंकू, फळ आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तिका देऊन त्यांचा सन्मान करावा. यामुळे व्रताची सांगता योग्य प्रकारे होते.
मानसिक पूजा: जर तुम्ही शारीरिक कारणांमुळे किंवा मासिक पाळीमुळे पूजा मांडू शकत नसाल, तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करून घ्यावी आणि स्वतः मानसिक पूजा करावी. उपवास पाळावा आणि मनोभावे प्रार्थना करावी.
नैवेद्य आणि विसर्जन: शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना देवीला पुरणपोळीचा किंवा गुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी कलशाचे आणि घटकाचे रितसर विसर्जन करावे. भक्तीमध्ये नियमांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. तिथींच्या बदलामुळे गोंधळून न जाता, उपलब्ध वेळ आणि सोयीनुसार देवीची भक्ती करावी. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
