यावर्षी कामिका एकादशी गुरुवार, २१ जुलै २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्यात साजरी होणारी दुसरी एकादशी आहे. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी म्हटले जात असले तरी आषाढातच आणखी एक कामिका एकादशी असते. या एकादशीचं व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो, असं मानलं जातं. पूर्वजन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.
advertisement
कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठात जातो, असं मानलं जातं. एकादशीला केलेल्या व्रतानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीला सुख, समृद्धी व शांती मिळते. कामिका एकादशीचे व्रत भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी विष्णूची आराधना केल्याने कुटुंबावर त्यांची विशेष कृपा प्राप्त होते.
कामिका एकादशी व्रताची पद्धत:
सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. व्रताचा संकल्प करावा. भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून त्यांची पूजा करावी. विष्णूंना तुळस, पिवळी फुले, चंदन, अक्षता, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा विष्णूच्या मंत्रांचा "ॐ नमो भगवते वासुदेवाय" जप करावा. दिवसभर उपवास करावा. निरंकार करणे शक्य नसेल, तर फलाहार किंवा सात्विक भोजन (शेंगदाणा, बटाटा, साबुदाणा खिचडी) घेऊ शकता, पण मीठ टाळावे. रात्री जागरण करून भगवान विष्णूचे भजन-कीर्तन करू शकता. द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन दान करावे आणि दक्षिणा द्यावी. शुभ मुहूर्तावर उपवास सोडताना तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा.
कामिका एकादशीला तुळशीचे महत्त्व:
या एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते. कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे, तुळशीला जल अर्पण करणे आणि तुळशीच्या माळेने जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कामिका एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात, असे मानले जाते.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)