गॅरेज मेकॅनिक अशोक राठोड सांगतात की, गरम इंजिनवर थंड पाणी टाकल्यामुळे इंजिनमधील मेटलच्या भागांमध्ये अचानक ताण निर्माण होतो. त्यामुळे इंजिनच्या ब्लॉकमध्ये क्रॅक पडण्याची शक्यता असते. तसेच अशा थंड-गरम प्रक्रियेमुळे इंजिनचं ऑइल लीक होऊ शकतं जे पुढे गाडीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतं. मशीन गरम असेल तेव्हा त्याला थंड करण्यासाठी नैसर्गिक थंड होण्याची वाट बघावी.
advertisement
तसेच अशा प्रकारचे नुकसान झाल्यास गाडी दुरुस्त करणे खूप महाग पडू शकते. इंजिनमधील पार्ट्स बदलावे लागतात आणि अनेक वेळा संपूर्ण इंजिनच बदलण्याची वेळ येते. म्हणूनच अशा चुका टाळण्याची गरज आहे. जर इंजिन गरम झालं असेल तर गाडी काही वेळासाठी बंद करून ती सावकाश थंड होऊ द्यावी, असं अशोक राठोड सांगतात.
उन्हाळ्यात गाडी चालवताना नियमित ब्रेक घ्या, विशेषतः उन्हात प्रवास करताना दर 10-15 किमी अंतराने काही मिनिटे विश्रांती घ्या. यामुळे इंजिनला थंड होण्यासाठी वेळ मिळतो. तसेच इंजिन ऑइलची नियमित तपासणी करणे गरजेचं आहे. उन्हाळ्यात योग्य दर्जाचं ऑइल वापरल्यास इंजिन गरम होण्याची शक्यता कमी होते.
शेवटी आपली गाडी आपली जबाबदारी आहे. थोडी काळजी घेतली तर गाडीचं आयुष्य वाढवता येतं आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. उन्हाळ्यात गाडी चालवताना थोडा संयम आणि योग्य पद्धती वापरल्यास सुरक्षित आणि आरामदायक प्रवास शक्य होतो, असं गॅरेज मेकॅनिक अशोक राठोड सांगतात.