असाच एक प्रकार महाराष्ट्रातील मराठी राईडरसोबत विदेशात घडला, ज्याबद्दल त्याने सोशल मीडियावर शेअर केले.
नवी मुंबईतील बाईकर योगेश आलेकरी त्याच्या जागतिक सफरीदरम्यान यूकेमध्ये असताना त्याची अॅडव्हेंचर बाइक चोरीला गेली. प्रवास थांबणार असं वाटत असतानाच ब्रिटिश बाईकर्सने त्याला पुन्हा उभं केलं आणि नवी ऊर्जा दिली.... त्याला नवीन बाईक घेऊन दिली.
33 वर्षीय योगेश आलेकरी छोटासा ट्रॅव्हल व्यवसाय चालवतो आणि पार्ट-टाईम व्लॉगर आहे. तो आपल्या दुसऱ्या जागतिक भ्रमंतीवर सध्या आहे आणि यामध्ये त्याला 50 देश कव्हर करायचं आहे. आतापर्यंत त्याने 17 देश पार केले होते. मात्र 28 ऑगस्ट रोजी ब्रिटनमध्ये असताना त्याची KTM 390 Adventure आणि सर्व प्रवासी साहित्य चोरीNE गेलं. त्याचा मॅकबुक मात्र चोरट्यांनी टाकून दिल्याने पोलिसांच्या हाती लागला. योगेश म्हणाला, “मला वाटलं होतं आफ्रिकेत अडचणी येतील, पण यूकेमध्ये असं होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.”
advertisement
बातमी व्हायरल झाल्यानंतर ब्रिटनमधील ऑफ रोड सेंटर, मॅन्सफिल्ड या मोटारबाइक डीलरने योगेशला 5,000 पाउंड किंमतीची KTM 790 Adventure (२०२० मॉडेल) भेट दिली. ही बाइक आधीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि आश्चर्य म्हणजे ही बाईक भारतात उपलब्ध नसलेलं मॉडेल आहे. शिवाय तिची नोंदणी योगेशच्या नावावर केल्यामुळे सीमारेषा ओलांडताना अडचण येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. या घटनेला योगेशने बाईकर्स ब्रदरहूडचं खरं उदाहरण म्हटलं आहे.
बाइकसोबतच काही कंपन्यांनी त्याला कॅम्पिंग गिअर, मोस्को मोटो टँक व टेल बॅग, रायडिंग जॅकेट आणि बूट्स देखील भेट दिले. नवीन बाइकचं पूजन नॉटिंगहॅम येथील भगवती शक्तीपीठ मंदिरात करण्यात आलं.
सध्या योगेश मुंबईत आहे, पण तो नवीन पासपोर्ट, व्हिसा, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक कार्ड्स मिळवण्याची प्रक्रियेत आहे. त्यानंतर तो पुन्हा यूकेला परत जाऊन आयर्लंड, युरोप आणि आफ्रिकेतील सफर सुरू करणार आहे. अजूनही त्याच्या पुढे 30 देश आणि 35000 किमीचा प्रवास बाकी आहे.
योगेशने सांगितलं की इंग्लंड पोलिस चोरीच्या प्रकरणात फारसे सक्रिय नाहीत, तर मुंबई पोलिस यापेक्षा कितीतरी अधिक सहकार्य करणारे आहेत. “इथे माझा प्रवास थांबणार नाही, मी लवकरच पुन्हा जागतिक सफरीला सुरुवात करणारच,” असं ही ठामपणे योगेश म्हणाला.