सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत प्रवेश हाऊसफुल्ल झाले असून नवीन प्रवेश बंद आहे असा डिजिटल फलक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आला आहे. प्रवेश जरी फुल्ल झाला असेल तरीदेखील पालक आपल्या मुलांचे ॲडमिशन घेण्यासाठी शाळेमध्ये गर्दी करत आहेत. तर या शाळेत केवळ पापरी गावातील विद्यार्थीच नव्हे तर इतर सहा ते सात गावांमधील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहेत.
advertisement
शाळेला 16 वर्षांपूर्वी ISO मानांकन प्राप्त झाले आहे. इयत्ता पाचवी पासून सेमी-इंग्रजी सुद्धा सुरू आहे. पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेला 13 वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. तर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 शिक्षकांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 200 हून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून पापरी गावातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाते. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत 20 पेक्षा अधिक विद्यार्थीही दिसणे अवघड झालेले असताना या शाळेचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा पट 827 आहे. तर या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 300 विद्यार्थी सध्या वेटिंगवर आहेत. वर्ग संख्या, शिक्षकांची संख्या कमी असल्याने मुलांना प्रवेश देऊ शकत नाही. पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद शाळेचा जिल्ह्यात मोठा बोलबाला आहे.