बीड: प्रेमात एकमेकांची साथ असेल तर कितीही कठीण प्रसंग आला तर त्यातून मार्ग काढत यश संपादन करता येतं. अशीच काहीशी कहाणी बीड जिल्ह्यातील सतीश आणि सीमा या राठोड दाम्पत्याची आहे. घरची परिस्थिती बेताची, दोघांचं लव्ह मॅरेज अन् कुटुंबीयांचा विरोध अशा कठीण प्रसंगात त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. मिळेल ते काम करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं आणि दोघांनीही सरकारी नोकरी मिळवली. आता संपूर्ण गाव त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि यशाचं कौतुक करतंय.
advertisement
सतीश आणि सीमा राठोड हे दाम्पत्य बीडमधील वडवणी येथील आहे. महाविद्यालयीन जीवनात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, घरच्यांना या नात्याला विरोध दर्शवला. तेव्हा सतीश आणि सीमा यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून विवाह केला. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मिळेल ते काम करावं लागलं. त्यात कोरोनाचं लॉकडाऊन आलं आणि त्यामुळे त्यांच्यावर आणखी एक संकट कोसळलं.
Mothers Day : समाजाने नाकारलेल्या अनाथांची आई, Video पाहून तुम्ही कराल कौतुक
जिद्दीनं शिक्षण सुरूच
सीमा आणि सतीश यांनी संकटातून मार्ग काढत आफलं शिक्षण सुरू ठेवलं. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही त्यांनी शिक्षणाचा ध्यास आणि सरकारी नोकरी मिळवण्याचा निर्धार सोडला नाही. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुणे शहरात शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी सतीश आणि सीमा यांनी सुरुवातीच्या काळात कंपनीत फुलटाईम नोकरी केली.
कामातून उरलेल्या वेळेत अभ्यास
कामानंतर उरलेल्या वेळेत राठोड दाम्पत्य अभ्यासाला वेळ देत राहिले. अनेकदा परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्याकडे रिक्षाच्या भाड्यासाठी सुद्धा पैसे नसायचं. मात्र अशा अनेक अडचणींवर खंबीरपणे मात केली. दिवसरात्र मेहनत घेतली पण शिक्षण सोडलं नाही, असं सीमा सांगतात.
पाच वर्षांनी मिळालं फळ
लग्नानंतर तब्बल पाच वर्षांनी या संघर्षाला फळ मिळालं. काही महिन्यांपूर्वी सतीश राठोड यांची निवड माजलगाव येथील पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या मेहनतीचं पहिलं मोठं यश होतं. मात्र त्यांच्या यशाची ही गोष्ट इथेच थांबली नाही. त्यांच्या पत्नी सीमा राठोड यांचीही नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागामध्ये विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली. या दोघांचा संघर्ष म्हणजे युवकांसाठी एक प्रेरणास्थान आहे.
घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करत करत शिक्षण पूर्ण करणे आणि सरकारी नोकरी मिळवणे हे निश्चितच सोपं नाही. पण जिथे इच्छाशक्ती आणि जिद्द असते तिथे मार्ग नक्की सापडतो हे सतीश आणि सीमा यांनी सिद्ध केलं आहे.