छत्रपती संभाजीनगर : आपल्याला जर परदेशामध्ये नोकरी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला तिथली भाषा येणे गरजेचे आहे. पण व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जर्मन ही एक महत्त्वाची भाषा आहे. ती युरोपियन युनियनमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हीच जर्मन भाषा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकवली जात आहे. येथील विद्यार्थी ही भाषा फाडफाड बोलतात.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी या ठिकाणी पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे. संभाजीनगर शहरापासून 37 किलोमीटर अंतरावरती ही शाळा आहे. पाचवी ते बारावीपर्यंत ही शाळा आहे. या शाळेमध्ये एकूण 813 विद्यार्थी संख्या आहे. सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवली जाते. या शाळेमध्ये परिपाठ देखील जर्मन भाषेतून केला जातो. त्यामध्ये सातवी ते दहावी पर्यंतचे 450 विद्यार्थी जर्मन भाषेतून परिपाठ करतात. आठवड्यातून दोन वेळा विद्यार्थी जर्मन भाषेत परिपाठ सादर करतात.
सिंधुदुर्गतील शिक्षकाचा नादखुळा, झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांना देतोय जर्मन भाषेचे धडे
या शाळेतील शिक्षकांनी अगोदर जर्मन भाषेची ट्रेनिंग घेतली असून विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक ही भाषा शिकवतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा. तसेच शासनाचा जर्मनीशी झालेल्या करारानुसार तिथे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच जर्मन भाषेचे ज्ञान दिले जात आहे. सध्या आठवड्यातून दोन वेळा विद्यार्थी जर्मन भाषेत परिपाठ करत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यासोबतच त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेसोबतच इतर वेगळी भाषा शिकता यावी यासाठी आम्ही ही जर्मन भाषा आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आमचे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने ही भाषा बोलायला लागलेली आहेत. यामुळे नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा फायदा होणार आहे, असं मुख्याध्यापक गोरखनाथ नजन यांनी सांगितलं आहे.
जर्मन भाषा शिकून मला खूप छान वाटत आहे. मी अगदी चांगल्या पद्धतीने ही भाषा बोलू शकतो आणि यासाठी आमचे सर्व शिक्षक आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने भाषेत शिकवतात, असे विद्यार्थ्यांनी देखील सांगितलं आहे.





