छत्रपती संभाजीनगर : अभ्यासाची आवड आणि भरपूर शिकण्याची इच्छा असतानाही अनेकजणांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागतं. अंगावर जबाबदारी आली की, शिक्षणासाठी पैसा असला तरी वेळ देता येत नाही. अशा सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत जे तुम्ही वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून नोकरी सुरू असतानाच पूर्ण करू शकता. AICTE अर्थात ऑल इंडिया कौन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशनने आता असाच एक नवा कोर्सही सुरू केला आहे. हा कोर्स नेमका काय आहे, त्यात प्रवेश घेण्यासाठी अटी काय आहेत, याबाबत तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कोर्सचं नाव आहे वर्किंग प्रोफेशनल. म्हणजेच नोकरी करता करता ज्यांना शिक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी हा खास कोर्स आहे. त्यासाठी कॉलेजेसमध्ये डिप्लोमाच्या तुकड्या सुरू करण्यात आल्या आहेत. 15, 30 आणि 60 अशा तुकड्या असतील.
advertisement
हेही वाचा : फक्त अभ्यासातच नाही, मुलं सगळ्यात होतील हुशार! त्यांना 'हे' 5 पदार्थ आवर्जून द्या
जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव असायला हवा. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला शिक्षण घेता येणार आहे. म्हणजेच ज्यांना सकाळी कामावर जायचं असेल त्यांचे क्लासेस संध्याकाळी होतील, तर दुपारी किंवा संध्याकाळी कामावर जाणाऱ्यांसाठी सकाळी क्लासेस असतील. विशेष म्हणजे सर्व वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच भरवले जातील.
ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या कामाचं ठिकाण हे कॉलेजपासून पन्नास किलोमीटर अंतराच्या आत असायला हवं. तसंच ऍडमिशनची सर्व प्रक्रिया ही रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी जशी असते तशीच असेल. दरम्यान, शिक्षण आणि नोकरी दोन्ही एकत्र सुरळीत सुरू राहील, त्यामुळे इच्छुकांनी या कोर्सला ऍडमिशन घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय. आपण https://www.aicte-india.org/ वेबसाईटवर जाऊन या कोर्सबाबत माहिती मिळवू शकता.





