पुणे: गाव-खेड्यात शिक्षण घेतलेले काही तरुण मोठी स्वप्नं घेऊन शहरात येतात. मोठ्या कष्टानं आणि मेहनतीनं स्वत:चं एक वेगळं विश्व उभारतात. तसेच समाजहिताच्या कामातून आपली वेगळी ओळख देखील निर्माण करतात. असंच काहीसं पुण्यातील एका गावाकडच्या मुलाच्या बाबतीत घडलंय. महारष्ट्रातील विधी क्षेत्रात गणेश शिरसाठ यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत त्यांनी 800 हून अधिक न्यायाधीश घडवले आहेत. शिरसाठ यांच्याच प्रवासाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
महाराष्ट्रातील विधी क्षेत्रात गणेश शिरसाठ यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. ग्रामीण भागातून पुण्याच्या शैक्षणिक आणि न्यायिक दुनियेत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करत, त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना यशस्वी न्यायाधीश आणि सरकारी वकील बनवण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि प्रेरणादायी कार्यामुळे अनेक तरुणांच्या आयुष्याला दिशा मिळाली आहे.
Inspiring Story: लव्ह मॅरेजला कुटुंबीयांचा विरोध, जोडप्यानं रिस्क घेतली, आता गाव करतंय कौतुक!
गणेश शिरसाठ हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी मानोर गावचे रहिवासी आहेत. गणेश शिरसाठ यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे 2004 साली पुण्यातील प्रतिष्ठित आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेत त्यांनी लॉचे शिक्षण पूर्ण केले. गावाकडून शहरात आल्यावर भाषेचा न्यूनगंड होता, मात्र तो दूर करत त्यांनी स्वतःला प्रत्येक पातळीवर सिद्ध केलं. गेल्या काही काळात त्यांनी कायदा क्षेत्रात अद्वितीय योगदान दिलं आहे. आजवर 800 हून अधिक न्यायाधीश आणि 400 हून अधिक सरकारी वकील त्यांनी घडवले आहेत.
गणेश शिरसाठ हे आता सदाशिव पेठेत राहतात. 2010 साली त्यांनी पुण्यात ‘गणेश शिरसाठ अकॅडमी’ सुरू केली. आज त्यांच्या अकॅडमीतून शिक्षण घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, सरकारी अभिव्यक्ता आणि महानगरपालिकेतील विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हजारो विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी समजून घेऊन ते मार्गदर्शन देतात. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातून नवी दिशा मिळते.
गणेश शिरसाठ हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोतही आहेत. “हे यश माझं एकट्याचं नाही, माझ्या आई-वडिलांचं आणि मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचं आहे,” अशा कृतज्ञतेच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्याला वळण मिळालं आहे आणि कायद्याच्या क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.