नाशिक: भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली काश्मीरमधील कारगिल परिसरात युद्ध झालं होतं. स्वातंत्र्यानंतर 2 देशांमध्ये झालेलं हे चौथं युद्ध होतं. कारगिल आणि परिसरातील लष्करी ठाण्यांचा ताबा घेतलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी मोठ्या शौर्यानं पळवून लावलं. तो संपूर्ण परिसर पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि मोठा विजय मिळवला. यंदा कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच 26 जानेवारीला संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर कारगिल युद्धातील नायक दीपचंद यांच्यासोबत लोकल18 ने संवाद साधला आहे.
advertisement
भारतीय जवान सीमेवर राहून देशाचं संरक्षण करत असतात. एकेका जवानाचे पराक्रमाचे किस्से दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहतात. 1999 मध्ये कारगील युद्धात देखील भारतीय जवानांनी पाकिस्तानला नमवलं. या युद्धात नाशिकमधील जवान दीपचंद यांनी मोठी कामगिरी बजावली. तर त्यानंतर भारतीय संसदेवरील हल्ला आणि त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेलं ‘ऑपरेशन पराक्रम’ यात दीपचंद यांना दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला. परंतु, त्यांनी आपल्या अत्युच्च त्यागाने भारतीयांसमोर देशभक्तीचा एक वेगळा आदर्श निर्माण केला.
वय वर्षे 22, महिन्याची कमाई फक्त 8 लाख, IT मध्ये नोकरी नाही तर पठ्ठ्याचा 200 म्हशींचा गोठा!
निवृत्त नायक दीपचंद हे मूळचे हरियाणाच्या हिसारचे रहिवासी आहेत. 1994 साली ते भारतीय सैन्यात दाखल झाले. घरी 6 भाऊ, बहिणी असा परिवार. मात्र, देशसेवेत दाखल झालेले ते एकमेव होते. त्यांचे आजोबा त्यांना देशभक्तीपर गोष्टी सांगत असत. त्याचबरोबर घरात असलेला सुभाषचंद्र बोस यांचा फोटो आणि त्याखाली लिहिलेली ‘तुम मुझे खून दो, में तुम्हें आजादी दूँगा’ या ओळींवर ते प्रेरीत झाल्याचे ते सांगतात.
1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याने सुमारे 60 दिवस लढा दिला होता. पाकिस्तानी सैन्यावर भारतीय लष्कराचा वरचष्मा होता. दीपचंद हे या युद्धात रणभूमीवर होते. ते क्षेपणास्त्र रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. पुढे ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान दीपचंद यांच्यासोबत एक भीषण अपघात झाला. दीपचंद आणि त्यांचे साथीदार परतीच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी तोफेचा गोळा फुटला आणि दीपचंद यांना गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोन्ही पाय आणि एक हात कापला होता. इतकं रक्त वाया गेलं होतं की, डॉक्टरांनी तब्बल 17 बाटल्या रक्त दिले. यातून अगदी कमी शक्यता असताना देखील मी वाचलो, असं दीपचंद सांगतात.
एवढं सगळं घडूनही इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आजही आयुष्य जकत आहे. गुडघ्यापर्यंत दोन्ही पाय कृत्रिम आहेत. त्यांनी गाजवलेलं शौर्य आणि देशप्रेम पाहून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील त्यांच्या ‘भारत निवास’ या घरावर तिरंगा नेहमी अभिमानाने फडकतो. कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या आपल्या साथीदारांचे त्यांनी घरभर फोटो लावले आहे. दीपचंद आजही कारगिलच्या युद्धाच्या आठवणी सांगताना भावूक होतात. त्यांच्यासारख्या सैनिकांमुळेच देश आणि देशातील जनता सुरक्षित आणि स्वाभिमानाचं जीवन जगत आहे.





