शिष्यवृत्ती देण्यामागचा मुख्य उद्देश काय?
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना असे त्या शिष्यवृत्तीचे नाव आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये. त्यांची आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येऊ नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ एकदाच विद्यार्थ्यांना मिळतो.
advertisement
लाभ कोणते विद्यार्थी घेऊ शकतात?
मातंग समाजातील 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकरीता ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. ज्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकीमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर ही शिष्यवृत्ती दिली जाते.
कागदपत्रे कोणती लागतात?
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे जमा करावी लागतात. ती पुढीलप्रमाणे,
1. जातीचा दाखला
2. उत्पन्नाचा दाखला
3. रेशन कार्ड
4. गुणपत्रिका
5. बोनाफाईड
6. दोन फोटो
7. आधार कार्ड
8. बँक पासबूक
ही कागदपत्रे देणे आणि या कागदपत्राची लाभासाठी पुर्तता करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज कोठे करायचा?
जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या कागदपत्रासह शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये आपले शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करता येतील, त्याची अंतिम तारीख 17 जुलै आहे. लवकरात लवकर गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.