सांगली: महाराष्ट्राला कुस्तीची बरीचं मोठी परंपरा लाभली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल या मातीत घडले आहेत. याच कुस्ती परंपरेचा पाईक, महाबली केसरी सांगलीचा मल्ल आता मार्केटच्या आखाड्यात उतरला आहे. लाल मातीशी जोडून ठेवणारा व्यवसाय त्यानं सुरू केलाय. विशेष म्हणजे या व्यवसायाची ख्याती आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सोबतच अगदी दुबईतही पोहोचलीये. पैलवान संग्रामसिंह जाधव यांच्या याच व्यवसायाबात आपण माहिती घेणार आहोत.
advertisement
एखादा तगडा मल्ल घडायचा असेल तर त्याला कसरतीसोबतच खुराकही चांगला असावा लागतो. पैलवानांच्या खुराकात त्यामुळेच थंडाई महत्त्वाची मानली जाते. इस्लामपूरचे मल्ल संग्रामसिंह जाधव यांनी हीच आरोग्यदायी थंडाई सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ते सांगतात की, "कोरोना काळात कुस्तीची मैदानी बंद होती. तेव्हा उत्पन्नाचा मार्ग म्हणून मी व्यवसायाच्या आयडिया शोधत होतो. यातूनच मला कुस्तीची नाळ जोडून ठेवणारी एक कल्पना सुचली. ती म्हणजे 'थंडाई' विक्रीचा व्यवसाय होय."
sangli farmer : 3 एकरात 53 टनचे विक्रमी उत्पादन, पपईच्या शेतीतून कमावलं 14 लाखांचं उत्पन्न
12 महिने चालणार व्यवसाय
"सुरुवातीला थंडाईच्या विक्री बाबत शंका होती. कारण आपल्याकडे थंडाई म्हणजे 'फक्त पैलवानांचे पेय' असाच विचार केला जातो. तरीही लोकांना थंडाईचे आरोग्यदायी फायदे समजावून देत, थंडाई विक्रीला छोट्या जागेतून सुरुवात केली. थंडाई हे बारा महिने चालणारे पेय आहे. शिवाय थंडाई लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरते, असंही पैलवान संग्रामसिंह सांगतात.
शाही थंडाईची थेट दुबईत शाखा
"पुढे लोकांचा कल हळूहळू थंडाईकडे वाढू लागला. यातूनच शाही थंडाईचा आज 22 शाखांमध्ये विस्तार झाला आहे. यापैकी एक शाखा दुबई येथे माझी बहीण चालवते. तर तेविसावी शाखा कर्नाटक सीमा भागातील निपाणी शहरांमध्ये लवकरच सुरू होणार आहे. आज 'शाही थंडाई' हा उद्योग समूह मोठा विस्तारला आहे. तरुणांसह महिला वर्गामध्येही थंडाईची आवड निर्माण झाल्याचंही ते सांगतात.
सायकलवर विकले पापड, शेवया; पती-पत्नीच्या मेहनतीला फळ, वर्षाला 30 लाखांची उलाढाल
आईची नेहमीच साथ
पैलवानांच्या खुराकाचा महत्त्वाचा भाग असणारी थंडाई सामान्य लोकांनाही तितकीच आरोग्यदायी ठरेल. या विचारानं सांगलीच्या इस्लामपूर शहरातील पैलवान संग्रामसिंह जाधव यांनी दगडी कुंडा आणि लाकडाचा दंडा हातात घेतला. एम.कॉम. उच्चशिक्षित पैलवान तरुणाच्या या व्यवसायाला आई पहिल्यापासूनच पाठिंबा देत असल्याचे पैलवान संग्रामसिंह यांनी लोकल18शी बोलताना सांगितले.
इस्लामपूरचा पैलवान गाजवतोय मार्केट
दरम्यान, काजू, बदाम आणि शुध्द दुधासह 12 प्रकारचे जिन्नस वापरून तयार होणाऱ्या थंडाईने 4 वर्षांत बरीच लोकप्रियता मिळवली. पैलवानांसाठी अमृत मानल्या जाणाऱ्या या शाही थंडाईच्या महाराष्ट्रासह दुबई आणि कर्नाटक मध्ये अवघ्या चार वर्षात 23 शाखांमधून विस्तार होतो आहे. शाखा विस्तारातून नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते. यासह ऑनलाइन ऑर्डर वरून ही शाही थंडाई उपलब्ध करून देत इस्लामपूरच्या पैलवानानं मार्केट गाजवले आहे.