स्वप्नील पाटील हा मुळचा मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हराळवाडी या गावातील आहे. पिढीजात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नील याने अधिकारी व्हावं असं वडिलांचं स्वप्न होतं. मुलाने हे स्वप्न सत्यात उतरवलं असून त्याची सरळ सेवेतून आरोग्य निरीक्षकपदी निवड झालीये. स्वप्नीलचं शिक्षण हराळवाडीतील जिल्हा परिषद शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण कोरवली येथे तर पदवीचे शिक्षण सोलापुरातील दयानंद कॉलेजमध्ये झाले आहे.
advertisement
स्वप्नील सागंतो की, “कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. वडील शेतकरी असून त्यांचं मुलानं अधिकारी व्हावं हे स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2023 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे सरळ सेवा भरतीचा फॉर्म भरला होता. त्याची परीक्षा झाली आणि नुकतेच या सरळ सेवा भरतीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे आरोग्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.”
आता थांबायचं नाही!
आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाली असली तरी स्वप्नीलला इथंच थांबायचं नाही. त्याने राज्यसेवेच्या परीक्षेची देखील तयारी सुरू केली आहे. घरच्यांची मदत आणि वडिलांची साथ मिळाल्यामुळे मला हे यश संपादन करता आलं. घरच्यांनी साथ दिली नसती तर मी देखील एक शेतकरीच बनलो असतो. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करत राहावे. एके दिवशी यश नक्कीच मिळेल, असे आवाहन स्वप्नीलने केले आहे.