पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दाभा येथील वर्ग 6 वीचा विद्यार्थी मयंक प्रदीप इंदुरकर यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा तो सांगतो की, माझे वर्ग शिक्षक अंकुश गावंडे सर नेहमी नवनवीन उपक्रम राबवत असतात. वर्ग 5 मध्ये असताना त्यांनी कौन बनेगा डिव्हिजन मास्टर? हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. तेव्हा मी 200 ते 300 अंकांपर्यंत भागाकार सोडवत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत काही तरी वेगळं करायचं म्हणून सरांनी सांगितलं होतं. तेव्हा मी आठ दिवसांत 2 हजार अंकी संख्येचा भागाकार सोडवला, असे मयंक सांगतो.
advertisement
कौन बनेगा डिव्हिजन मास्टर? नेमका उपक्रम काय?
याबाबत माहिती देताना शिक्षक अंकुश गावंडे सांगतात की, दरवर्षीप्रमाणे इयत्ता पाचवीसाठी काही तरी नवीन उपक्रम ठेवायचा हा विचार करत असताना माझ्या डोक्यात भागाकाराची भीती हा विषय लक्षात आला. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कशी घालायची? त्यासाठी मी कौन बनेगा डिव्हिजन मास्टर? हा उपक्रम सुरू केला. यात सर्वात आधी कमीत कमी संख्येपासून भागाकार सुरू केला. दररोज विद्यार्थ्यांचा सराव होऊ लागला. विद्यार्थी 300 ते 400 अंकी संख्येचा भागाकार करत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना काही तरी वेगळं करायला सांगितलं होतं. शाळा सुरू झाल्यानंतर मयंक जेव्हा मला गणित दाखवायला आला. तेव्हा मी थक्क झालो. कारण त्याच्या वयाच्या मुलांना फक्त 5 ते 6 अंकी गणित अभ्यासाला आहेत, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते सांगतात की, मयंक हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. वडील दुकानात काम करतात. आई मजुरी करते. पण, मयंक हा खूप जिद्दी आहे. त्याला जे मिळवायचं ते तो मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. त्याला कुठलीही ट्यूशन नाही, तरीही त्याची जिद्द आणि मेहनत त्याला इथपर्यंत घेऊन आली. पुढेही तो खूप मोठं काही तरी करेल अशी मला आशा आहे. मयंकच्या या कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक केले. त्याला बक्षीस सुद्धा देण्यात आले. त्याचबरोबर इतरही अनेक लोकांनी मयंकसारख्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, असेही अंकुश गावंडे यांनी सांगितले.





