अझहर अहमद असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो मालेगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करतो. याच रुग्णालयात १६ वर्षीय पीडित तरुणी नर्स म्हणून काम करत होती. तिच्यावर अझहरने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला रुग्णालयात नोकरीवर कसं काय ठेवलं? यावरून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासात अझहर अहमद या संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेचा भाजपासह शिवसेना, कुल जमाती तंजीम या मुस्लीम संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. संशयित आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या संघटनांनी केली असून याबाबतचं निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.