मन्सुरी हा अमेझॉनसोबत जोडल्या गेलेल्या सप्लायरकडे कामाला होता. बरेच दिवस तो कामावर येत नव्हता आणि त्याच्याकडे असलेली पार्सलही ग्राहकांच्या घरी पोहोचवत नव्हता. डिलिव्हरी होत नसल्यामुळे सप्लायरकडे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या, यानंतर कंपनीच्या मॅनेजरने पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी मन्सुरीला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली आहे.
advertisement
14 जुलै रोजी अमेझॉनच्या अहमदाबादच्या नरोडा येथील गोडाऊनमधून 171 पार्सल लोडिंग रिक्षेमधून खाडियामधील गोल लिमडा जवळच्या सप्लायरच्या युनिटमध्ये पाठवण्यात आले, पण ही पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाहीत, ज्यामुळे संशय निर्माण झाला. सप्लायरकडून तपासणी केली असता डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्त केलेला मन्सुरी गायब झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी जेव्हा गोडाऊनची झडती घेतली तेव्हा पार्सल गायब झाली आहेत तसंच डिलिव्हरी बॉयने मालकासोबतचा संपर्कही तोडला असल्याचं स्पष्ट झालं.
तपासादरम्यान मन्सुरीने 164 मोबाईल फोन असलेली पार्सल चोरली होती, ज्यात 22.5 लाख रुपये किंमतीचे 45 आयफोन आणि 25 इतर प्रीमियम फोन होते. मन्सुरीने हे मोबाईल महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानमध्ये कमी किंमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. आलिशान आयुष्य जगण्यासाठी मन्सुरीने हे मोबाईल चोरल्याचं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी मन्सुरीच्या अस्तोदिया येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकला, पण तो तिथे सापडला नाही. यानंतर पोलिसांनी खबरी आणि टेकनिकल तपासाच्या आधारे आरोपीला काही तासांमध्ये शोधून काढलं आणि त्याला अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेले अनेक पार्सल जप्त केली आहेत, तसंच पुढील चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
मन्सुरीने जवळपास 50 फोन विकल्याचंही तपासामध्ये समोर आलं आहे. हे फोन विकून मिळालेले पैसे त्याने कशासाठी वापरले? तसंच या रॅकेटमध्ये त्याच्यासोबत आणखी कोण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. मन्सुरीच्या रिमांडदरम्यान या सगळ्याची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.