'ईडी'च्या नावाने 27 लाखांची फसवणूक
व्यावसायिक लक्ष्मण कुलकर्णी यांना 31 ऑगस्ट रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. 'तुमचा मोबाईल नंबर बंद होईल, अधिक माहितीसाठी 9 दाबा', अशी सूचना आल्याने त्यांनी ती दाबून संपर्क साधला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण 'अंमलबजावणी विभागातून' (Enforcement Directorate - ED) बोलत असल्याचे सांगितले.
या तोतया अधिकाऱ्याने कुलकर्णी यांना सांगितले की, "तुमच्या नावाने असलेल्या मुंबईतील खारघरच्या बँक खात्यातून 6 कोटी रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार झाला आहे आणि त्यासाठी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते." कारवाई टाळण्यासाठी त्यांनी खात्याची चौकशी करण्याची बतावणी करत एका बँक खात्यात 37 लाख रुपये भरण्यास सांगितले. ‘जर काही गैरव्यवहार आढळला नाही, तर 24 तासांत रक्कम परत मिळेल’, असे आश्वासनही दिले. कुलकर्णी यांनी पैसे भरले, पण 24 तास उलटूनही रक्कम परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
advertisement
'सीबीआय'च्या नावाने 10 लाखांची फसवणूक
अशीच दुसरी घटना नोकरदार मंगेश पंडित यांच्यासोबत घडली. त्यांना 'सीबीआय'मधून बोलत असल्याचे सांगून शिवप्रसाद आणि सिमी मॅडम या नावाने फोन आला. ‘तुमचे आधार कार्ड दिल्लीतील 'ह्यूमन ट्रॅफिकिंग केस'मध्ये सापडले आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर करून 3 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे आणि त्याचे कमिशन म्हणून तुम्हाला 30 लाख रुपये मिळाले आहेत’, असे सांगून त्यांना धमकावण्यात आले. या चौकशीसाठी अटक टाळायची असल्यास 10 लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. पंडित यांनी पैसे भरले, पण 24 तासांत रक्कम परत मिळाली नाही. या दोन्ही घटनांमध्ये नागरिकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली असून, विश्रामबाग पोलीस या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमागे दडलंय काय?
हे ही वाचा : इस्लामपूरच्या राजकारणात जयंत पाटील यांचा 'मास्टर प्लॅन', विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार?