मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन पोलिसांना आरावी समुद्रकिनारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या खिशात एक आधार कार्ड सापडले. त्यावरून त्याचे नाव सचिन खोडवे असून तो मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना मृतदेहाजवळ श्रीवर्धन शहरातील एका लॉजची पावतीही सापडली. या पावतीनुसार, सचिन गेल्या १२ दिवसांपासून या लॉजवर मुक्कामी होता. तो इतके दिवस श्रीवर्धनमध्ये का थांबला होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
advertisement
सचिन खोडवे यांची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली आहे, याबाबतचे गूढ कायम आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस अधिक तपास करत असून, सचिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.