दिल्ली पोलीस दलातील धडाडीची SWAT कमांडो काजल हिची कहाणी आज प्रत्येक संवेदनशील मनाला चटका लावून जाणारी आहे. ज्या हातांनी तिला संरक्षणाचं वचन दिलं होतं, त्याच हातांनी तिचा क्रूर अंत केला.
दिल्ली हादरली आहे ती एका गुन्हेगाराच्या कृत्याने नाही, तर एका पतीच्या नराधमपणामुळे. 27 वर्षांची काजल, जी दिल्ली पोलिसांच्या सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या SWAT (Special Weapons and Tactics) युनिटमध्ये कमांडो होती, तिला तिच्याच नवऱ्याने लोखंडी डंबलने प्रहार करून हत्या केली.
advertisement
स्वप्नांची भरारी आणि प्रेमाचा सापळा
सोनीपतच्या गनौर गावची लेक असलेल्या काजलने 2022 मध्ये दिल्ली पोलीस दलात प्रवेश केला. तिची जिद्द पाहून तिची निवड स्पेशल सेलच्या SWAT युनिटमध्ये झाली. याच काळात तिची ओळख गनौरमधीलच अंकुर याच्याशी झाली. अंकुर संरक्षण मंत्रालयात क्लर्क होता. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2023 मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला. बाहेरून पाहणाऱ्यांना हे जोडपं अत्यंत सुखी आणि प्रगत वाटत होतं, पण घराच्या चार भिंतींच्या आड वेगळंच वास्तव होतं.
लग्नाला 15 दिवस उलटत नाहीत तोच काजलचा छळ सुरू झाला. गाडी आणि पैशांच्या मागणीसाठी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जाऊ लागला. छळ असह्य झाल्याने 2024 मध्ये काजल दिल्लीत वेगळी राहू लागली. मात्र, अंकुरने तिथेही तिची पाठ सोडली नाही. विशेष म्हणजे, ज्यावेळी तिच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा काजल चार महिन्यांची गरोदर होती.
रात्री 10 च्या सुमारास अंकुर आणि काजलमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अंकुरने काजलचे डोके आधी दरवाजाच्या चौकटीवर आपटले आणि नंतर जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी डंबलने तिच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलला वाचवायला कोणीही आले नाही. नंतर स्वतः अंकुरनेच तिला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 27 जानेवारी 2026 रोजी काजलने जगाचा निरोप घेतला.
काजलच्या मृत्यूने केवळ एका पोलीस अधिकारीचा जीव गेला नाही, तर तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या जीवाचाही अंत झाला. पोलिसांनी अंकुरला अटक केली आहे आणि त्याच्यावर खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमला घराच्या चौकटीवर आणि डंबलवर रक्ताचे डाग आढळले आहेत, जे या क्रूरतेची साक्ष देतात.
ज्या लेकीच्या कर्तृत्वावर गावाला अभिमान होता, तीच लेक जेव्हा तिरंग्यात लपेटून गावात परतली, तेव्हा प्रत्येकाचा कंठ दाटून आला. शासकीय इतमामात काजलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाची सलामी आणि कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचं पाणी झालं. काजलची हत्या हे समाजापुढील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. जर देशाची कमांडो मुलगीच घरात सुरक्षित नसेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचं काय? हुंड्याची ही लालसा अजून किती 'काजल'चा बळी घेणार? हा प्रश्न आज अनुत्तरीत आहे.
