राणी नावाच्या महिलेची हत्या प्रथमदर्शनी अपघात किंवा अज्ञात हल्लेखोरांचा गुन्हा वाटत होता. मात्र पोलिस तपासानं जे सत्य उघड केलं ते अंगावर काटा आणणारं आहे. ही हत्या तिच्या नवऱ्यानंच करायला सांगितली होती आणि त्यासाठी त्याने सुपारी दिली होती. यामागचं कारण म्हणजे परस्त्रीसंबंध आणि दुसऱ्या विवाहाचं गुपित.
राणीचा पती ईश्वर सोनगरा याचे तोषिका नावाच्या महिलेसोबत संबंध होते. इतकंच नव्हे, तर त्याने तीन वर्षांपूर्वी तिच्याशी गुप्तपणे विवाह केला होता. राणी या नात्याचा विरोध करत होती. ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी संसार टिकवू इच्छित होती, पण ईश्वर आपली प्रेमिकाला सोडण्यास तयार नव्हता.
advertisement
राणीला अनेक दिवसांपासून धमक्या मिळत होत्या. तिची आई कांता यांनी सांगितलं की, ईश्वरची प्रेमिका तोषिका आणि तिची आई वारंवार फोन करून राणीला घर सोडण्याचा दबाव टाकत होते.
ईश्वर आणि त्याची दुसरी पत्नी तोषिकानं राणीला मार्गातून हटवण्यासाठी कट रचला. त्यांनी सोन्याचं कर्ज काढून सुपारीसाठी पैसे जमवले. पिस्तुलासाठी 20 हजार आणि हत्या करण्यासाठी 40 हजार रुपये मुजफ्फर नावाच्या शूटरला दिले.
14 ऑगस्ट रोजी शाळेतून परत येत असताना मुजफ्फर नंबर प्लेट नसलेल्या बाइकवर हेल्मेट घालून आला आणि राणीवर गोळी झाडली. त्यानंतर तो फरार झाला.
पोलिस तपासानं उलगडलेले धागे
हत्यानंतर ईश्वरनं पत्नीची हत्या अज्ञात गुन्हेगारांनी केल्याचं सांगितलं आणि तिला एमवाय रुग्णालयात नेऊन शव मोर्चरीत ठेवला. पण पोस्टमार्टमदरम्यान डॉक्टरांना राणीच्या डोक्यात गोळी लागल्याचं आढळलं. यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिसांत आक्रोश केला.
कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी ईश्वर सोनगरा, तोषिका सोनगरा, मुजफ्फर, अमन आणि मोहम्मद समद यांना अटक केली. तपासात उघड झालं की ईश्वर आणि तोषिकाने एकत्र राहण्यासाठी राणीचा खून करण्याची योजना आखली होती.
हा प्रकार मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये घडला आहे. हे प्रकरण फक्त खुनापुरतं मर्यादित नाही, तर ते विवाहातील विश्वासघात, लोभ आणि नात्यांतील काळ्या बाजूचं उदाहरण आहे.
