ही घटना परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकादेवी येथील आहे. गंगाधर देवकाते असं पीडित तरुणाचं नाव आहे. तर विठ्ठल देवकते, अंगद देवकते, शिवाजी देवकते, रेणुका देवकते, केवळ देवकते आणि कुशावर्ता देवकते असं आरोपींची नावं आहेत. या सर्वांनी आधी गंगाधर यांच्या आईला मारहाण करून ढकलून दिलं. यानंतर गंगाधरला विष पाजण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर देवकते आणि त्यांचे चुलते यांच्यात आजोबांच्या नावावरील ४४ आर. शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी १० जुलै रोजी गंगाधर देवकते यांच्या आईने विठ्ठल देवकते यास शेत वाटून का देत नाहीस? अशी विचारणा केली. यावरून दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला.
यावेळी आरोपी विठ्ठल देवकते, अंगद देवकते, शिवाजी देवकते, रेणुका देवकते, केवळ देवकते, कुशावर्ता देवकते यांनी गंगाधर यांच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना ढकलून दिलं. याचा जाब विचारण्यासाठी गंगाधर देवकते आपल्या चुलत्याच्या घरी गेले. यावेळी विठ्ठल देवकते व इतरांनी त्यांना काठीने मारहाण केली. तसेच खाली पाडून विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.