खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले की, नोटन दास उर्फ संजय सचदेवा असं आरोपीचं नाव आहे. गेल्या महिन्यात त्याने काही शेजाऱ्यांसमोर त्याची पत्नी सपना दास (३५) हिच्यावर हल्ला केला होता. परंतु त्यावेळी महिलेने आरोपी संजय विरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. सोमवारी (९ जून) त्याने खारघर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सपनाची हत्या केली.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी हे जोडपे त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांसह दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले होते. सपनाची बहीण संगीता मखीजा ही एक भारतीय नागरिक आहे. हिनेच खारघरच्या सेक्टर ३४ मधील डॉल्फिन प्राइड सोसायटीमध्ये त्यांच्यासाठी भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. मखीजा हीच या जोडप्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करत होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये अलीकडेच उद्भवलेल्या संघर्षामुळे हे जोडपं घरी परतणार होतं. त्यासाठी प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्जही केला होता.
पाकिस्तानी नागरिकाने पत्नीला का मारलं?
पण याच कारणातून हे हत्याकांड घडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सहामहिन्यापूर्वी पती आणि मुलांसह भारतात आलेल्या सपनाला पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचं होतं. मात्र नोटनदासला पाकिस्तानात जायचं नव्हतं. तो भारतातच राहण्यास इच्छुक होता. याच कारणावरून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता. याच वादातून सोमवारी नोतनदासने सपनावर चाकूने अनेक वार केले. हल्ला इतका भयंकर होता की, सपनाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर पाकिस्तानी नागरिक नोटनदास यानेही त्याच घरात आत्महत्या केली. दोन पाकिस्तानी नागरिकांचा अशाप्रकारे मुंबईत शेवट झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.