केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांना बापाने रात्रभर उलटे टांगले. यावेळी नातींना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या आजोबावरही आरोपीने हल्ला केला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार: बुधवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' म्हणून ओरडत होत्या. मात्र, त्यांच्याच आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही.
advertisement
मुलींना घराच्या छताला बांधून निष्ठुर आई-वडील घरातच निर्धास्त झोपले होते. तर बाहेर आजी-आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता. तर आई-वडील पोटच्या मुलीच्या मृतदेहाखालीच निर्धास्तपणे झोपले होते. गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत सानिकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह घरी आणला.
गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न
ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी मृत सानिकाचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अनुजाच्या जबाबाने भांडाफोड
जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार सांगितला. "आम्हाला वडिलांनी हात-पाय बांधून उलटे टांगले आणि मारहाण केली, असे तिने सांगितल्याने डॉक्टरांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.
कुटुंबातील अंतर्गत वाद
या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींना सोडणाऱ्या आजोबांवरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने हल्ला करत त्यांना धमकावले होते. यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि क्रौर्याची परिसीमा स्पष्ट होत आहे.
निर्दयी आई-बापाला कठोर शिक्षा द्या
सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर खून व खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. 'अशा निर्दयी लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,' अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.






