कृष्णा बाळू गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तर मनोज मिश्रा असं फिर्यादी सासऱ्याचं नाव आहे. आरोपी जावई कृष्णा हा बुधवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सासरे मिश्रा यांच्या घरी आला होता. त्यावेळी मिश्रा हे आपल्या घराखाली उभे होते. यावेळी आरोपी कृष्णा व त्याच्यासोबत दुचाकीवर आलेल्या दोन साथीदारांनी मिश्रा यांना तलवारीचा धाक दाखवला आणि 'पाच लाख रुपये दे, नाही तर मुलीसोबतच्या विवाहाचे फोटो व्हायरल करेल, तुमच्या दोघांचा जीव घेईन,' अशी धमकी दिली.
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड परिसरातील सातभाईनगर येथे राहणाऱ्या फिर्यादी मनोज मिश्रा यांच्या मुलीचं आरोपी कृष्णा गायकवाड याच्याशी मागील वर्षी लग्न झालं होतं. पण लग्नानंतर जावई कृष्णाचा स्वभाव आणि वागणे योग्य वाटलं नाही. त्यामुळे मिश्रा यांनी आपल्या मुलीा लग्नानंतर गायकवाड यांच्याकडे नांदण्यास पाठवलं नाही. तसेच कृष्णासोबत झालेला विवाह रद्द करून मिळावा, यासाठी त्यांच्या मुलीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज देखील दाखल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
दरम्यान, मिश्रा यांच्या मुलीचे एका दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं. सहा महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडादेखील झाला. पण याची माहिती आरोपी कृष्णाला मिळताच त्याने नवीन स्थळ आलेल्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्याने संबंधित कुटुंबाला नियोजित नवरीसोबत आपलं आधीच वैदिक पद्धतीने लग्न झाल्याचे सांगितले. शिवाय विवाहाचे फोटो देखील दाखवले. कृष्णाच्या या कृत्यामुळे मिश्रा यांच्या मुलीचं जमलेले लग्नदेखील मोडलं. आता मुलीशी घटस्फोट हवा असेल तर पाच लाख रुपये द्या, अशी खंडणी आरोपीनं सासऱ्याकडे मागितली. तसेच तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.