वर्धा जिल्ह्यातील लोनसावळी गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क आणि कपड्यांसाठी पालकांकडून पैसे न मिळाल्यामुळे हताश झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (4 जुलै) रात्री उघडकीस आली. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव सोनिया वासुदेव उईके (वय 17, रा. लोनसावळी) असे आहे. सोनिया ही वर्धा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि रामनगर येथील शासकीय वसतिगृहात वास्तव्यास होती. अकरावीचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या उन्हाळी सुट्टीसाठी गावात आली होती.
advertisement
बारावीच्या प्रवेशासाठी तिने घरच्यांकडे वारंवार पैसे मागितले होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे तिच्या पालकांनी "पैसे आले की अॅडमिशन घे" असे सांगितले होते. मात्र सततच्या तणावामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
शुक्रवारी रात्री घरी कुणीही नसताना सोनियाने संधी साधून बाथरूमच्या छताला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही धक्कादायक घटना त्यांच्या निदर्शनास आली. लगेचच पुलगाव पोलिसांना कळवण्यात आले.
सोनियाच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, आर्थिक कारणांमुळे एक उज्वल भविष्य असलेली मुलगी अशा प्रकारे आयुष्य संपवेल, यावर अनेकांना विश्वास बसत नाही. या घटनेने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि पालकांच्या आर्थिक क्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.