बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता आर. माधवनने आपल्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. अजय देवगनसोबतच्या 'दे दे प्यार दे २' च्या रिलीजपूर्वीच, माधवनने आता ज्यांना 'भारताचे एडिसन' म्हटले जाते, त्या महान व्यक्ती जी.डी. नायडू यांच्या बायोपिकमधील आपला फर्स्ट लुक टीझर शेअर केला आहे. या टीझरमधील माधवनचा अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
advertisement
ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल शॉक
जी.डी. नायडू यांच्या बायोपिकमधून माधवन पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालेल, असा अंदाज टीझरवरून लावला जात आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या टीझरमध्ये पहिल्याच नजरेत माधवनला ओळखणे त्याच्या चाहत्यांसाठीही खूप कठीण झाले आहे.
टीझरच्या सुरुवातीला आर. माधवन वेल्डिंग करताना दिसत आहे आणि त्याने आपला चेहरा झाकलेला आहे. त्यानंतर तो हळूच मास्क खाली करतो आणि त्यांचा नवा लूक समोर येतो. माधवनने हा टीझर शेअर करताना लिहिले आहे, "जी.डी. नायडू यांची स्पिरिट आता अधिकृतपणे समोर आली आहे. ही एक अशी कहाणी आहे, ज्यात अतुलनीय दृष्टी, मोठे महत्त्वाकांक्षेचे स्वप्न आणि अटूट संकल्प आहे. जी.डी. नायडू यांचा हा पहिला टीझर सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे."
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
हा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर चाहते आणि सहकलाकारांनी माधवनच्या या भूमिकेचे जोरदार कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, "वर्सटाईल मॅडी (Versatile Maddy)." अभिनेता नील नितीन मुकेशने फायर इमोजी शेअर करून त्याचे कौतुक केले. एका चाहत्याने म्हटले, "हे देवा! माधवन, तुम्ही दरवेळी प्रत्येक मानक ओलांडून जाता. आणखी एका असाधारण अभिनयाची आम्ही वाट पाहत आहोत." शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यानेही माधवनचे कौतुक केले आहे.
२०२६ मध्ये रिलीज होणार 'GDN'
'जीडीएन' (GDN) नावाच्या या बायोपिकमध्ये आर. माधवनसोबत जयराम, योगी बाबू आणि प्रियामणि यांसारखे दक्षिणेकडील कलाकारही असणार आहेत. कृष्णकुमार रामकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर वर्गीस मूलन पिक्चर्स आणि ट्राईकलर फिल्म्स यांनी संयुक्तपणे निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट २०२६ मध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होण्याची शक्यता आहे.
