'लग्न पंचमी'चा प्रयोग रद्द; अमृता-स्वप्नील भावूक
अजित पवार यांचे मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी मनोरंजन विश्वही सुन्न झाले. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'लग्न पंचमी' या गाजलेल्या नाटकाचा आज पुण्यात प्रयोग होणार होता. मात्र, दादांच्या निधनामुळे धक्का बसलेल्या टीमने तातडीने आजचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नाटकाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "आजच्या या अत्यंत दुःखद घटनेमुळे आम्ही शोकाकुल आहोत. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आजचा प्रयोग रद्द करत आहोत." अमृता खानविलकरनेही ही पोस्ट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे. केवळ नाटकच नाही, तर अनेक आगामी चित्रपटांच्या टीमनेही आपापले टीझर, ट्रेलर आणि पोस्टर लाँचचे सोहळे पुढे ढकलले आहेत.
मराठी सिनेसृष्टीत दुःखाचं सावट
मराठी अस्मितेचा विषय मांडणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचा आज महत्त्वाचा प्रेस शो आणि प्रीमियर होणार होता. मात्र, निर्मात्यांनी तातडीने हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, बहुप्रतिक्षित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या टीमने पुढील दोन दिवस कोणतीही प्रमोशनल पोस्ट, रिल्स किंवा इंटरव्ह्यू प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. कलेपेक्षा माणसाचा सन्मान मोठा, हीच भावना आज संपूर्ण सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहे.
तसेच, चिंचवड येथे होणारा 'द फोल्क आख्यान'चा २९ जानेवारीचा प्रयोगही रद्द करण्यात आला आहे. "महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या शोकाकुल वातावरणात आम्ही आख्यानाचा थाट मांडू शकत नाही," अशा शब्दांत आयोजकांनी आपली हळहळ व्यक्त केली.
तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
अजित दादांच्या निधनामुळे राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ असे तीन दिवसांचे दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणतेही शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटण्याची शक्यता आहे.
