गडचिरोलीच्या जंगलाचा विचार केला की, मनात दाट हिरवाई, अरण्याची भीतीदायक शांतता आणि तिथे दडलेला संघर्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. या जंगलात अनेक कथा जन्माला येतात. काही भयावह, काही हृदयाला भिडणाऱ्या. याच पार्श्वभूमीवर आता मोठ्या पडद्यावर एक नवी कहाणी येत आहे. 'अरण्य' असं सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना जंगलाच्या कठीण वास्तवाशी तसेच मानवी नात्यांच्या गुंतागुंतीशी समोरासमोर आणणार आहे.
advertisement
( 'हे टाका सगळीकडे, कळूदे सगळ्यांना'; प्रियाने सगळ्यांसमोर आणला न पाहिलेला उमेश कामत, VIDEO )
टीझरमध्ये काय आहे?
1 मिनिटं 13च्या टिझरच्या सुरुवातीलाच हार्दीकने 'जंगलचा वाघ' म्हणून स्वतःला संबोधले आहे. 'बंदूक हीच माझी ओळख आहे', असे तो ठामपणे बोलताना दिसतोय. यावरून तो नक्षलवादी असल्याचं स्पष्ट होतं. मात्र त्याच्या आयुष्यात मुलगी आल्यावर सर्वकाही बदलल्याचेही तो बोलत आहे. पुढे टिझरमध्ये त्याच्या मुलीच्या हातातही बंदूक दिसत आहे. आता वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ती देखील त्याच मार्गावर चालणार का? की या कारणामुळे कुटूंब जंगल सोडून जाणार? हा प्रश्न टीझर पाहून उभा राहतो. 19 सप्टेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
अरण्यची स्टारकास्ट
या सिनेमात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. गडचिरोलीच्या दाट जंगलात हा सिनेमा सूट करण्यात आला आहे. सिनेमात अस्सल विदर्भी लहेजा आणि वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
"अरण्य ही केवळ एका नक्षलवाद्याची कथा नाही तर नात्यांमध्ये गुंतागुंत आणि जंगलातील संघर्षाचे वास्तव दर्शन घडवणारी कहाणी आहे. कलाकारांनी भूमिकेत जीव ओतून काम केले असून त्यांची केमिस्त्री प्रेक्षकांना भावेल", असं सिनेमाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी म्हटलं आहे.
निर्माते शरद पाटील यांनी म्हटलं "अरण्यची खासियत म्हणजे त्याची मांडणी आणि अस्सलपणा. हा केवळ अॅक्शन वा ड्रामा चित्रपट नाही, तर जीवनातल्या नात्यांच्या प्रश्नांना भिडवणारी कथा आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या वातावरणासोबत एक वेगळी संवेदना अनुभवायला मिळेल. म्हणूनच हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावा."