८९ वर्षीय धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याची बातमी पसरल्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याची अफवा पसरली असतानाच, पत्नी हेमा मालिनी आणि सनी देओलच्या टीमने त्यांच्या तब्येतीबद्दल सत्य सांगितले आहे.
हेमा मालिनी आणि सनी देओलचं चाहत्यांना आवाहन
धर्मेंद्र यांना पाहण्यासाठी हेमा मालिनी यांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर, संपूर्ण देओल कुटुंब यावेळी रुग्णालयात उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबतची चिंता आणखीनच वाढली. अशातच धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याच्या बातमीवर हेमा मालिनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले, आम्ही धर्मेंद्र लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहोत.
advertisement
हेमा मालिनी यांनी ट्विट करत धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी लिहिलं, "रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल असलेल्या धरमजींबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की त्यांच्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा."
सनी देओलच्या टीमनेही धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आज दिवसभर असा दावा करण्यात येत होता की धर्मेंद्र यांची तब्येत गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. यावर सनी देओलच्या टीमने सांगितलं, नेहमीप्रमाणेच ही एक अफवा आहे. धर्मेंद्र बरे होत असून त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
धर्मेंद्र यांच्या तब्येतीसाठी चाहते करत आहेत प्रार्थना
धर्मेंद्र यांना ऑक्टोबरच्या अखेरीसही एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाढते वय आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात यावे लागले. त्यावेळी त्यांच्या टीमने सांगितले होते की, ते केवळ नियमित तपासणीसाठी आले होते आणि उर्वरित तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाले.
धर्मेंद्र यांची टीम आणि कुटुंबाने दिलेल्या माहितीमुळे त्यांच्या तब्येतीबद्दल पसरलेला संभ्रम दूर झाला असून, त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर राहावी, यासाठी चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूड प्रार्थना करत आहे.
