दशावतार सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सिनेमानं सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी प्रेक्षक बाबुली मेस्त्रीचा राखणदार बनला आहे. सिनेमानं अवघ्या सहा दिवसांत 9.45 कोटींची कमाई केली आहे. झी स्टुडिओकडून सिनेमाचं टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर करण्यात आलं आहे. अवघ्या सहा दिवसांत सिनेमानं मोठा टप्पा पार केला आहे.
advertisement
दशावतार हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरत असून सिनेमा भारतातच नाही तर भारताबाहेरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. अनेक अमराठी प्रेक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलंय. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहे.
दशावतार सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याची सर्वांना उत्सुकता होती. दशावतार हा सिनेमा सुरुवातीला तब्बल 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे 600 शोज् होते. शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज् असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून 'दशावतार' ला प्रचंड दाद मिळत आहे.
सिनेमा का घालतोय प्रेक्षकांना भुरळ?
'दशावतार'च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे.
सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.