'पुन्हा एकदा साडे माडे तीन'चे प्रदर्शन लांबणीवर
मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय असलेला 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. मात्र, संवेदनशीलतेचे दर्शन घडवत निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या टीमने एक भावूक पोस्ट शेअर केली.
advertisement
या पोस्टमध्ये टीमने लिहिलंय, "महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. हा धक्का अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक मराठी मन आज हळहळत आहे. या दुःखद प्रसंगी आम्हीही या शोकभावनेत सहभागी आहोत. त्यामुळेच संवेदनशीलतेची जाणीव ठेवत, आमच्या 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या कठीण क्षणी माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समस्त महाराष्ट्राप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. टीम पुन्हा एकदा साडे माडे 3." पुढील दोन दिवस या चित्रपटाचे कोणतेही रील्स, मुलाखती किंवा गाणी रिलीज होणार नाहीत, असाही निर्णय टीमने घेतला आहे.
बारामतीत जनसागर; शासकीय इतमामात दादांवर अंत्यसंस्कार
राज्य सरकारने घोषित केलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याचा आज दुसरा दिवस आहे. आज बारामतीमध्ये दादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांना शेवटचं पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटला आहे. राजकीय मतभेद विसरून प्रत्येकजण आज अत्यंत जड अंतःकरणाने अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे उपस्थित आहे.
