Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच अबू धाबी पर्यटनाच्या जाहिरातीसाठी एकत्र दिसून आले. या जाहिरातीत दीपिकानं हिजाब परिधान केला होता आणि रणवीर सिंगनं लांब दाढी ठेवलेली होती. त्यांच्या या लूकवर काही चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं, तर काही लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. दीपिकाला तिच्या हिजाबमुळे ट्रोल करण्यात आलं. लोक 'जय श्री राम'चे नारे देत आहेत. दीपिकाचा हेतू कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा नसून, ती जिथे जाते तिथल्या संस्कृतीचा आदर करते. हिजाब परिधान करणं ही त्या ठिकाणच्या नियमांप्रमाणे आवश्यक बाब होती. जाहिरातीच्या शूटिंगसाठी दीपिकाने हिजाब परिधान केला होता.
advertisement
काय होती 'ही' जाहिरात?
दीपिका आणि रणवीर यांनी ही जाहिरात एखाद्या सिनेमासाठी नव्हे तर पर्यटन प्रचारासाठी केली होती. ही जाहिरात अबू धाबीच्या संस्कृतीवर आधारित होती. दीपिकानं स्वतः ही जाहिरात तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत “माझं शांततेचं ठिकाण” असं कॅप्शन दिलं. या जाहिरातीत दीपिका दोन वेगवेगळ्या पोशाखांमध्ये दिसते. एकामध्ये ती जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये तर दुसऱ्या दृश्यात तिने हिजाब परिधान केलेला पाहायला मिळत आहे. जाहिरातीत अबू धाबीच्या संस्कृतीचा आदर ठेवत तिथल्या पारंपरिक पेहरावाचंही दर्शन घडवलं गेलं आहे. दीपिका पदुकोण सध्या अबू धाबीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
PC : deepikapadukone
हिजाबवरून झाली ट्रोल
दीपिका आणि रणवीर जाहिरातीत शेख जायद ग्रँड मशीदचं सौंदर्य दाखवतात आणि तिथल्या शांततेबद्दल बोलतात. पण काही लोकांना दीपिकाचं हिजाब परिधान करणं खटकलं. काहींनी म्हटलं की, तिनं हिंदू संस्कृतीचा विचार न करता अरब संस्कृतीचं महत्त्व वाढवलं. एका युजरनं लिहिलं, "दीपिका पदुकोण दुटप्पी आहे, तरीही लोक तिचे चित्रपट पाहतात." आणखी एका युजरनं लिहिलं, "भारतातही अनेक महत्त्वाची ठिकाणं आहेत, मग ती त्यांचा का प्रचार करत नाही?" काहींनी तर तिच्या पोस्टखाली "जय श्री राम" चे नारे दिले. ही पैशांसाठी काहीही करू शकते, असंही नेटकरी म्हणाले आहेत.
चाहत्यांकडून दीपिकाचां समर्थन
दीपिकाच्या समर्थकांनी तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काहींनी सांगितलं की, दीपिका जेव्हा भारतातील मंदिरांमध्ये जाते, तेव्हा तीही पारंपरिक आणि सभ्य कपडेच घालते. त्याचप्रमाणे, ती जेव्हा मशीदमध्ये गेली, तेव्हा तिथल्या संस्कृतीचा आदर करत हिजाब परिधान केला. एका युजरनं तर वस्तुस्थिती स्पष्ट करत सांगितलं की, “शेख जायद मशीदमध्ये कोणालाही प्रवेश मिळवायचा असल्यास हिजाब परिधान करणं बंधनकारक आहे. पॉप सिंगर रिहानानेसुद्धा जेव्हा ती तिथे गेली होती, तेव्हा हिजाब परिधान केला होता.”
रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा चित्रपट येत्या 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेता खूप उत्सुक आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटात झळकणार आहे. तसेच तिच्याकडे प्रभासचा स्पिरिट आणि कल्किचा सीक्वेलदेखील होता. पण या दोन्ही प्रोजेक्टमधून दीपिका बाहेर पडली आहे.