या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वाचनाची आवड वाढविणे, समाजात वाचन संस्कृती रुजविणे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञान सहजतेने पोहोचविणे हा आहे. शहरातील जुन्या, स्क्रॅप बसचे पुनर्वापर करून त्याला नव्या रूपात सजविण्यात आले आहे. टाकाऊ पासून टिकाऊ या विचारातून तयार झालेल्या या बसमध्ये आकर्षक रंगसंगती, कार्पेट आणि सोयीस्कर आसनव्यवस्था करून ती एक छोटेखानी वाचनालयात परिवर्तित करण्यात आली आहे.
advertisement
या बसमध्ये जवळपास 250 पुस्तके ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मराठी साहित्य, इतिहास, धर्म, राजकारण, आत्मचरित्र, तसेच प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश आहे. ही सर्व पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध आहेत. कोणीही या बसमध्ये येऊन बसू शकतो, काही वेळ वाचनाचा आनंद घेऊ शकतो आणि पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवू शकतो.
हा अभिनव उपक्रम पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून साकारला गेला आहे. त्यांनी सांगितले की, पीएमपीएमएल ही फक्त प्रवासाचे साधन नाही, तर ती सामान्य माणसांच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे जनतेला या उपक्रमाच्या माध्यमातून जोडणे आणि वाचनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणे हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे.
सध्या ही फिरती वाचनालय बस एफसी कॉलेज परिसरात आठ दिवसांसाठी ठेवण्यात आली असून, त्यानंतर ती बोपोडी परिसरात नेण्यात येणार आहे. पुढील काळात ही बस पुण्यातील विविध ठिकाणी फिरत राहील आणि नागरिकांना पुस्तकांच्या सहवासाचा नवा अनुभव देईल.
पुणे हे नेहमीच शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर राहिले आहे. शहरात अनेक पुस्तक मेळावे, वाचन प्रेरणा उपक्रम आणि साहित्य संमेलने होत असतात. मात्र, बसच्या माध्यमातून वाचन संस्कृती जनतेपर्यंत पोहोचविण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
वाचाल तर वाचाल या संदेशावर आधारित हा प्रकल्प वाचनाला प्रोत्साहन देणारा एक आदर्श उपक्रम ठरत आहे. यामुळे पुस्तक वाचन ही केवळ शाळा किंवा ग्रंथालयापुरती मर्यादित न राहता ती समाजातील प्रत्येकासाठी सहज उपलब्ध होणार आहे.
पुण्यातील तरुण पिढी, विशेषतः विद्यार्थी वर्ग, या वाचनालयात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या संकल्पनेतून केवळ वाचन संस्कृती नव्हे तर पर्यावरणपूरक विचार आणि टिकाऊ विकासाचा दृष्टिकोन देखील अधोरेखित होत आहे. जुन्या बसचा पुनर्वापर करून समाजहिताचा उपक्रम राबविण्याची ही अनोखी कल्पना निश्चितच पुणेकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.