बंद होणाऱ्या शाळेची भावनिक गोष्ट
या चित्रपटाचा टीझर खूप मनोरंजक आहे आणि तो मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्यावर प्रकाश टाकतो. टीझरमध्ये दाखवले आहे की, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, शाळेचे जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर त्यांच्या शाळेतील आठवणींची, तुटलेल्या नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची एक नवी भावनिक सफर सुरू होते. हेमंत ढोमे प्रेक्षकांना थेट त्याच्या शालेय जीवनाची सफर घडवणार आहे.
advertisement
दिग्गजांची दमदार फौज
या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची जबरदस्त फौज दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर हे मुख्यध्यापकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि पुष्करराज चिरपुटकर यांसारखे लोकप्रिय कलाकार आहेत. विशेष म्हणजे, युट्यूबर आणि सोशल मीडिया सेन्सेशन प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे खूपच भावूक झाला. तो म्हणाला, "शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. आपण घडतो ते शाळेतच. पहिली भीती, पहिला राग, पहिली मैत्री, पहिलं प्रेम हे सारंकाही आपण शाळेतच अनुभवतो. प्रेक्षकांचं मनोरंजन करत मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना आपली शाळा आठवणार आणि मराठी शाळा पुन्हा भरणार!"
'झिम्मा' आणि 'झिम्मा २' सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या क्षिती जोगच्या 'चलचित्र मंडळी' निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांनी केली आहे. ही 'मराठी शाळा' १ जानेवारी २०२६ पासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
