या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, एका मुलाखतीत सुबोध खानोलकर यांना दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या 'बाबुली' या भूमिकेसाठी रजनीकांतचाही विचार झाला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुबोध यांनी एक खूपच धक्कादायक खुलासा केला आहे.
“दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता, तर...”
सुबोध खानोलकर यांनी 'हापूस' आणि 'संदूक' नंतर 'दशावतार' हा कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट लिहिला आहे. दिग्दर्शनाबद्दल बोलताना ते म्हणाले, “दिग्दर्शन करायचं असं काही ठरलं नव्हतं, पण ही कथा दुसऱ्या कोणाच्या हातात दिली असती, तर माझ्या मनात जे होतं, ते नीट पोहोचवता आलं नसतं.”
advertisement
सुबोध पुढे म्हणाले, “कथा वाचल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं की 'बाबुली'ची भूमिका खूप कठीण आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त दिलीप प्रभावळकरांचंच नाव होतं. आमची ओळखही नव्हती. मी नंबर मिळवून त्यांना भेटायला येऊ का असं विचारलं.” दिलीप प्रभावळकर हे असे कलाकार आहेत की, जे संपूर्ण स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि त्यातले बारकावे माहीत असल्याशिवाय होकार देत नाहीत.
सुबोधने सांगितलं, “माझ्याकडे फक्त कथा होती, ती मी त्यांना ऐकवली. आमची अर्ध्या तासाची मीटिंग साडेतीन-चार तास चालली. तेव्हा माझ्या आशा वाढल्या. मी हे ठरवलं होतं की, जर 'दशावतार'ला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता, तर ही कथा मी गुंडाळून ठेवली असती. कारण, ही भूमिका इतर कोणीही सादर करू शकत नाही, हे आधीच ठरलं होतं.”
“ते रजनीकांतपेक्षा कमी आहेत का?”
रजनीकांत यांच्या नावाचा विचार झाला होता का, या प्रश्नावर सुबोध खानोलकर हसून म्हणाले, “ते रजनीकांतपेक्षा कमी आहेत का? रजनीकांत यांचा विचार वगैरे आम्ही कधीच केला नव्हता.”
ते म्हणाले, “कथेची गरज अशी होती की यातला 'बाबुली मिस्त्री'चा रोल हा एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे. या भूमिकेत अभिनेता, पात्र आणि लूकचे प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. ही भूमिका तशी कठीण होती. हे सगळं प्रभावीपणे करू शकेल आणि त्याकरता लागणारा स्वभाव, गंभीरता असणारं दिलीप प्रभावळकर सर सोडून दुसरं कुणीच डोक्यात नव्हतं.” म्हणूनच त्यांनी पटकथा लिहायच्या आधीच दिलीप प्रभावळकरांकडून होकार मिळवला होता.