दरम्यान, नुकतंच किरण माने यांनी फेसबुकवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की एका नंबरवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांना ज्या नंबरवरून धमकी देण्यात आली आहे, तो नंबरही शेअर केला आहे.
किरण माने यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, "जय जिजाऊ, 9702914142 या नंबरवरून मला फोन करून बहुजनांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या एका मातेला अत्यंत अश्लील शब्दांत शिवीगाळ केली गेली आहे. मला खुनाची धमकी दिली गेली. अर्थात हा फोन मी प्रसिद्ध करणार नाही कारण समाजात प्रक्षोभ होईल असे तो बोलला आहे. २४ सेकंदात मी फोन कट केला. अर्थात मी अशांना कोलतो हे तुम्हालाही माहिती आहे."
advertisement
किरण माने यांनी पुढे लिहिलंय, "मी कुठल्या मंत्र्याकडे दाद मागणार नाही. कोरकटकर सोलापूरकरनंतर याही नीच व्यक्तीला संरक्षण मिळेल याची खात्री आहे. मी पोलिसात तक्रारही करणार नाही. मला कुठल्याही गोदी मिडीयानं बाईटसाठी फोन करू नये. त्यांनी महाचर्चेसाठी एखादी क्षुल्लक गोष्ट निवडावी. मला त्रास देऊ नये."
किरण माने यांनी बहुजनांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "हा वरील जो नंबर आहे तो शिव फुले शाहु आंबेडकरांना मानणाऱ्या बहुजनांनी सेव्ह करून ठेवावा. तो बळीचा बकरा बनवण्यासाठी बहुजनांमधला पोरगा असेल तर त्याला त्रास देऊ नये. त्याचा 'बोलविता धनी' शोधावा. मी मरणाला घाबरत नाही. मी मारहाणीला घाबरत नाही. मी बदनामीला पुरून उरलोय. मी तुरूंगाला घाबरत नाही. मी लै लै लै कणखर आहे. तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेल्या शिवरायांचा आणि पेनाच्या टोकाने मनुवाद फाडणाऱ्या भीमरायाचा मी चेला आहे. मला जर काही झाले तर मी समाजासाठी निधड्या छातीने सामोरा जाईन. पण नंतर मात्र माझ्या बलीदानाला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र धर्मानं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. जय शिवराय... जय भीम. - किरण माने."
दरम्यान, किरण माने यांच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली असून त्यांना अशा प्रकारची धमकी कोणी दिली असेल असा प्रश्न विचारला जात आहे. किरण माने यांच्या या पोस्टनंतर प्रशासन कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.