‘मनाचे श्लोक’चा ट्रेलर खूपच मजेशीर आणि आकर्षक आहे. ट्रेलरमध्ये श्लोक आणि मनवाच्या केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते, पण त्यांची प्रेमकथा वाटते तितकी सोपी नाहीये!
‘मनाचे श्लोक’ च्या धमाकेदार ट्रेलरमध्ये काय आहे?
श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवाच्या कुटुंबातही तिच्या लग्नाची गडबड सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत दोघांच्या स्वप्नांचं काय होणार? ते दोघे एकत्र येऊन लग्नासाठी तयार होतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता ट्रेलरने वाढवली आहे. यात हसू, गोडवा आणि काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात.
advertisement
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणते, “हा चित्रपट फक्त श्लोक आणि मनवाचा प्रवास नाही, तर त्यांच्या कुटुंबांचाही आहे. यात नाती, प्रेम, मैत्री आणि खूप मजा आहे. प्रेक्षकांना हे सगळं आपलंच वाटेल आणि ते नक्कीच या गोष्टीत रमून जातील.”
कधी रिलीज होणार फिल्म?
प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य यांच्या मते, ही आजच्या काळातील प्रेमकथा असली तरी, त्यात कुटुंबाची चौकट आहे. निर्माते संजय दावरा म्हणाले, “यातील प्रसंग सगळ्यांच्याच घरात घडतात. लहानसहान गमतीजंमती आणि अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.”
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे सोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.