कोण आहे हा अभिनेता?
अनेक मराठी सिनेमे, नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची जादू दाखवल्यानंतर मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आता हिंदी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची नवी फिल्म ५ सप्टेंबरला रिलीज होणार असून यामध्ये मराठीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. चिन्मय मांडलेकरच्या या सिनेमाचे नाव आहे इन्स्पेक्टर झेंडे, जो सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये दमदार अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदी सिनेमातील सर्वात दमदार अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे मनोज वाजपेयी. त्याच्या चित्रपटांची आणि वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.
advertisement
कधी आणि कुठे पाहता येणार ‘इन्स्पेक्टर झेंडे’?
मनोज वाजपेयीच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटाची घोषणा होऊन आता एक महिना झाला आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट उद्या, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. या चित्रपटात कुख्यात 'सीरियल किलर' चार्ल्स शोभराजला पकडण्याचं थरारक ऑपरेशन दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी मधुकर बापूराव झेंडे यांनी शोभराजला जेलमधून पळून गेल्यानंतर पकडलं होतं. याच धाडसी मोहिमेभोवती चित्रपटाची कथा फिरते.
फिल्ममध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी
मनोज वाजपेयीने या चित्रपटात पोलीस अधिकारी मधुकर बापूराव झेंडे यांची भूमिका साकारली आहे. १९७० च्या दशकात ‘बिकिनी किलर’ म्हणून कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजला पकडण्यात झेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्याची आणि बुद्धीची ही गोष्ट आता मनोज वाजपेयी पडद्यावर घेऊन येत आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयीसोबतच जिम सर्भ, गिरिजा ओक, सचिन खेडेकर, भाऊ कदम, हरिश दुधाडे आणि ओंकार राऊत असे अनेक मोठे कलाकार आहेत.