'बाबुली मेस्त्री' मल्याळममध्ये बोलणार
लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी नुकतीच एक मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. 'दशावतार' आता मल्याळम भाषेत डब होऊन केरळमधील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
सुबोध यांनी लिहिले, "चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं! जगभरातल्या मराठी रसिकांनी भरभरून प्रेम दिलेला आपला 'दशावतार' आता मल्याळम भाषेतून केरळमधल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय! २१ नोव्हेंबरपासून!" आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाऊसफुल गर्दीत चित्रपट सुरू असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
advertisement
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अघटित कथानक
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात 'बाबुली मेस्त्री' या कसलेल्या दशावतारी कलावंताची भूमिका साकारली आहे. दशावतार हा कोकणातील पारंपरिक कलाप्रकार आहे. आपल्या शेवटच्या प्रयोगासाठी रंगमंचावर गेलेल्या बाबुलीच्या आयुष्यात अचानक एक अघटित गोष्ट घडते आणि चित्रपटाची कथा संपूर्णपणे पलटते. सुबोध खानोलकर यांची ही कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे.
चित्रपटाचे वंदू आणि माधव म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनीही ही पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
तगडी स्टारकास्ट आणि दमदार टीम
दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर यांसारखे तगडे कलाकार आहेत. सुबोध खानोलकर यांनी या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे, तर गुरू ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखनाची जबाबदारी सांभाळली.
