'सुंदरा मनामध्ये भरली' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया नाईक हिने आता थेट बॉलिवूडमध्ये नेटफ्लिक्ससारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर धमाकेदार पदार्पण केले आहे. तिच्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमाचे नाव आहे 'ग्रेटर कलेश' आणि विशेष म्हणजे, सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेन्डिंग आहे.
नेटफ्लिक्सवर ट्रेंड होतेय फिल्म
अक्षया नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच नवरात्रीनिमित्ताने तिने विविध स्त्री-भूमिकांचे खास फोटोशूट केले होते. आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. १७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या 'ग्रेटर कलेश' सिनेमात अक्षयाने 'पंखुरी' नावाचे पात्र साकारले आहे.
advertisement
आपल्या ओटीटी पदार्पणाबद्दल बोलताना अक्षया खूप आनंदी आहे. ती म्हणाली, "प्रत्येक कलाकाराला नेहमी एक पाऊल पुढे टाकायचं असतं. माझ्यासाठी नेटफ्लिक्स हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि माझा पहिला बॉलिवूड चित्रपट डेब्यू याच प्लॅटफॉर्मवर होईल, याची मी कल्पनाही केली नव्हती. ही संधी खूप खास आहे."
अक्षयाला खऱ्या अर्थाने मिळालं दिवाळी गिफ्ट
चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असल्याचा अक्षयाला खूप आनंद आहे आणि तिने याला आपले 'दिवाळी गिफ्ट' म्हटले आहे. अक्षयाने सांगितले की, "मी Terribly Tiny Tales (TTT) चा कंटेंट अनेक वर्षांपासून फॉलो करतेय आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. तसेच, नेटफ्लिक्सवर काम करण्याचेही स्वप्न होते. या फिल्मच्या निमित्ताने मी मॅनिफेस्ट केलेल्या दोन्ही गोष्टी एकत्र पूर्ण झाल्या!"
टिपिकल मराठी मुलगी ते दिल्ली गर्ल
या सिनेमात अक्षया नाईकसहित एहसास चन्ना, सुप्रिया शुक्ला, संगीता बालाचंद्रन असे तगडे कलाकार आहेत. सेटवरील अनुभव सांगताना अक्षया म्हणाली की, "मी एकमेव नवीन अभिनेत्री होते, पण कोणीही मला आउटसायडर असल्याची जाणीव करून दिली नाही."
आपली भूमिका लहान असली तरी ती महत्त्वपूर्ण आहे, असे ती मानते. याचे श्रेय तिने दिग्दर्शक आदित्य चंदिओक आणि लेखक रितू मागो यांना दिले आहे. अक्षया म्हणाली, "एका टिपिकल मराठी मुलीकडून त्यांनी एक टिपिकल 'दिल्ली गर्ल' साकारून घेतली आहे. चांगल्या माणसांसोबत चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा आनंद शब्दांत मांडता येत नाही!"
