"राहुल गांधींवरचा तो शेवटचा विनोद होता..."
नसीरुद्दीन शाह त्यांच्या स्पष्ट आणि कठोर भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राहुल गांधींच्या धाडसी भूमिकेचं कौतुक केलं. शाह म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत 'कौन राहुल?' असा टोमणा मारला होता. पण मला वाटतं, तो राहुल गांधींवर केलेला शेवटचा विनोद होता."
advertisement
शाह यांनी पुढे सांगितलं की, विरोधकांकडून नेहमीच टार्गेट केले जाणारे राहुल गांधी आता एक लढवय्ये आणि आत्मविश्वासाने भरलेले नेते म्हणून समोर आले आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या माध्यमातून मतचोरी होत असल्याचा जो दावा केला आहे, त्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं नसीरुद्दीन शाह यांनी विशेष कौतुक केलं.
कर्नाटकच्या मतदारसंघात १ लाख मतांची चोरी?
राहुल गांधी यांनी एका तपशीलवार प्रेझेंटेशनमध्ये कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक बनावट मतं असल्याचा आरोप पुराव्यांसहित केला आहे. या आरोपांमुळे देशभरात एकच गदारोळ सुरू झाला आहे. काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या पडताळणीमध्येही हे आरोप खरे असल्याचं समोर आलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राहुल गांधींच्या या प्रयत्नांना 'भारतीय लोकशाहीचं रक्षण करण्यासाठीची एकट्याची लढाई' असं म्हटलं आहे.
या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायला सांगितलं आहे, तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. पण नसीरुद्दीन शाहंसारख्या मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.