सौंदर्यामागे लपलेली क्रूरता
'नटखट स्माईल आणि मोहक अदा' हीच माधुरीची ओळख आहे, पण 'मिसेस देशपांडे'च्या काही सेकंदांच्या टीझरमध्ये तिचा एक वेगळाच आणि थरारक चेहरा पाहायला मिळतोय. टीझरमध्ये माधुरी पिवळ्या रंगाच्या सुंदर वेशात, आरशासमोर बसून मेकअप आणि दागिने काढताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे शांत आणि सुंदर हास्य अचानक एका क्रूर आणि कठोर स्मितहास्यात बदलते.
advertisement
पुढच्याच क्षणी ती तुरुंगाच्या कपड्यांमध्ये, सळ्यांमागे उभी असल्याचे दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हा बदल तिच्या भूमिकेची गूढता स्पष्ट करतो. वयाच्या ५८ व्या वर्षी पहिल्यांदाच माधुरीने करिअरमधील ही अतिशय वेगळ्या पठडीतील भूमिका स्वीकारली आहे.
फ्रेंच थ्रिलरचा रिमेक
नागेश कुकनूर दिग्दर्शित ही सीरिज मुळात फ्रेंच थ्रिलर शो 'ला मांते' चा रिमेक आहे. 'ला मांते' (२०१७) ची कथा अशी आहे, 'वर्षानुवर्षे तुरुंगात असलेली एक सीरिअल किलर, तिच्यासारख्याच कॉपीकॅट हत्यांच्या मालिकेची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करण्याची ऑफर देते. पण तिची एकच अट असते, तिचा मुलगा जो आता पोलीस अधिकारी झाला आहे, त्याने तिच्यासोबत काम करावे.'
अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित या सिरीजमध्ये प्रियांशु चॅटर्जी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, चाहते माधुरीला या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
माधुरी दीक्षितचा शेवटचा चित्रपट 'भूल भुलैया ३' दिवाळीत हिट ठरला होता. तर, ओटीटीवर तिने २०२२ मध्ये 'द फेम गेम' या नेटफ्लिक्स सिरीजमधून पदार्पण केले होते.
