या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेला रहमान डकैत हा गुंड मुख्य व्हिलन दाखवण्यात आला आहे. चित्रपटात त्याच्या क्रूरतेची झलक वेळोवेळी पाहायला मिळाली. मात्र आता सोशल मिडिया आणि काही रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा भाऊ उझैर बलूच हा रहमानपेक्षाही जास्त क्रूर आणि विकृत आहे.
रहमान डकैतपेक्षाही क्रूर होता त्याचा भाऊ उझैर बलूच
advertisement
'धुरंधर' चित्रपटातील रणवीर सिंगचा स्वॅग आणि अक्षय खन्नाचा 'रहमान डकैत' अवतार पाहून प्रेक्षक शिट्ट्या वाजवत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? या सिनेमात जे दाखवलंय, त्यापेक्षाही भयंकर आणि क्रूर वास्तव पाकिस्तानच्या लियारी भागात घडलं होतं. या सिनेमात अक्षय खन्नाचा भाऊ म्हणजेच 'उझैर बलूच' (दानिश पंडोर) दाखवला आहे. पडद्यावरचा उझैर जितका हिंसक वाटतो, त्यापेक्षा कैक पटीने अघोरी आणि निर्दयी होता खराखुरा उझैर बलूच! सध्या त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने उभ्या जगाचा थरकाप उडवला आहे.
उझैर बलूचच्या दहशतीचा एक किस्सा आजही लियारीच्या लोकांच्या मनात धडकी भरवतो. आपला कट्टर शत्रू अरशद पप्पू याची हत्या केल्यानंतर उझैरने जे केलं, ते ऐकून कोणाचंही काळीज फाटेल. असं म्हणतात की, अरशदला मारल्यानंतर उझैरने त्याचं मुंडकं धडावेगळं केलं आणि त्या कापलेल्या डोक्याशी तो चक्क फुटबॉल खेळला! हा केवळ सिनेमाचा सीन नाही, तर उझैर बलूचच्या क्रूर मानसिकतेचं जिवंत उदाहरण होतं.
उझैर बलूचचा तो व्हिडीओ व्हायरल
ज्या काळात लियारी हा भाग गरिबी, भूक आणि टोळीयुद्धाने होरपळत होता, त्याच काळात उझैर बलूच खंडणी आणि ड्रग्जच्या पैशांवर मजा मारत होता. त्याचं चार मजली आलिशान घर, स्विमिंग पूल आणि घराच्या आवारातील पाण्याचे कारंजे पाहून कोणाचेही डोळे विस्फारतील. धक्कादायक म्हणजे, बाहेरची जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत असताना उझैरच्या घरी मात्र पाण्याचा अपव्यय सुरू असायचा.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पत्रकार नूर-उल-आरिफीन यांनी उझैरचा एक दुर्मिळ इंटरव्ह्यू घेतला आहे. या व्हिडिओमध्ये पत्रकार ज्या पद्धतीने उझैरला प्रश्न विचारतोय, ते पाहून नेटकरी विचारत आहेत, "हा पत्रकार आता जिवंत आहे का?"
इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा पत्रकाराने विचारलं की, "तुमच्या उत्पन्नाचं साधन काय?" तेव्हा उझैर अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला, "मी एक ट्रान्सपोर्टर आहे, माझी दुबईत जमीन आहे." पुढे पत्रकाराने जेव्हा स्विमिंग पूल आणि पाण्याच्या उधळपट्टीवर बोट ठेवलं, तेव्हा उझैरने उत्तर दिलं की, "ही तर अल्लाहची देण आहे." इतकंच नाही, तर ज्याच्या हाताला शेकडो लोकांच्या रक्ताचे डाग लागले होते, तो उझैर कॅमेरासमोर म्हणतो, "मी आजवर एका मुंगीलाही मारलेलं नाही!"
हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. एका युजरने लिहिलंय, "या पत्रकाराला खरंच 'धुरंधर'मध्ये रोल मिळायला हवा होता, काय धाडस आहे!" तर दुसऱ्याने लिहिलं, "ज्या गँगस्टरने माणसाच्या मुंडक्याचा फुटबॉल केला, त्याला असे प्रश्न विचारणं म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखं होतं." 'धुरंधर' चित्रपटाच्या यशामुळे आता या खऱ्या आयुष्यातील राक्षसांच्या कथा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. 'धुरंधर २' मध्ये उझैर बलूच या खऱ्या हैवानाचा चेहरा अधिक गडदपणे दिसणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.
