अभिनेता प्रसाद ओकचा शंभरावा सिनेमा आणखी एका कारणासाठी खास ठरला आहे कारण याच वर्षी त्याने त्याच्या वयाची पन्नाशी देखील गाठली आहे. या निमित्तानं प्रसाद ओकचा वडापाव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचा धमाल टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय. ही रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा सिनेमा आहे. तो पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.
advertisement
टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, "वडापाव एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे."
निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन आणि अमित बस्नेत म्हणाले, '"मराठी प्रेक्षक कौटुंबिक चित्रपटांवर नेहमी प्रेम करतात. ‘वडापाव’ ही कथा त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. 'वडापाव' तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे." प्रसाद ओकच्या वडापाव या सिनेमाची ट्रिट प्रेक्षकांना 2 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे.