'असंभव'मधील प्रिया बापटचा लूक तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अप्रतिम मेकओव्हर असलेला आहे. तिने या चित्रपटात एका ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेची भूमिका साकारली आहे. पडद्यावर हे 'असंभव' रूप खरे वाटावे यासाठी प्रियाला दररोज तब्बल साडेतीन तास मेकअपच्या खुर्चीवर बसावे लागत होते. तिची ही मेहनत आता प्रेक्षकांना थक्क करत आहे.
advertisement
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वयाच्या भूमिका
आपल्या भूमिकेबद्दल प्रिया सांगते, "कलाकार म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची भूक असते. एकाच भूमिकेचे दोन वेगवेगळे वयोगट साकारणे ही माझ्यासाठी खूप दुर्मिळ संधी होती." तिने 'साधना सैगल' या पात्रासाठी ३५ वर्षांची महिला आणि त्यानंतर ७५ वर्षांची वृद्ध स्त्री, असे दोन्ही टप्पे जगले.
मेकअपने केवळ बाह्य रूप बदलले, पण त्या वयातील देहबोली आणि आवाज आत्मसात करण्यासाठी प्रियाला कसून मेहनत घ्यावी लागली. ती पुढे सांगते, "मेकअपमुळे पूर्णपणे बदललेलं रूप घेऊन कॅमेऱ्यासमोर उभं राहणं हा एक वेगळा अनुभव होता. ७५ वर्षांची स्त्री कशी चालते? तिचा आवाज कसा असेल? तिच्या देहबोलीत काय बदल होतात? हे सगळं शिकून मी रिहर्सल करत होते." प्रियाच्या मते, स्वतःला त्या वयात नेणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता, जो तिने पूर्ण निष्ठेने पार पाडला.
'असंभव' चित्रपट २१ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, संदीप कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रियाच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर 'तू कमाल एफर्ट्स घेतले' आणि 'तुझा अभिमान वाटतो' अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
