रितेश म्हणाला, "28 जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळरात्र घेऊन आला. एक दु:खद बातमी आली. त्या बातमीनं जो धक्का दिला. त्यातून मीच काय अजून अख्खा महाराष्ट्र सारवलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार जी यांचं दु:खद अपघाती निधन झालं. खरं म्हणजे ही घटना माझ्यासाठी अनेक महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी आहे कारण ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर आपले लाडके दादा होते. आपण त्यांना प्रेमाने अजित दादा म्हणायचो पण खरं तर हा बापमाणूस होता. हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मला दादांना काही सांगायचंय..."
advertisement
"प्रिय दादा, आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल असं काही बोलायला लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तुमच्या शब्दांनी, शैलीने, नजरेच्या धाकाने, समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्या शब्दात होती. तुमच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झालाय. दादा, तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाणं म्हणजे त्रिवेणी संगमच. तुमचं रागावणसुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. तुमच्या असण्याने काय मिळत होतं ते तुमच्या नसण्याने जाणवत राहणार आहे."
रितेश पुढे म्हणाला, "अनेक वर्ष रखडलेली कामं तुमच्या एका आदेशानंतर लगेच मार्गी लागायची आणि म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील कामाचा माणूस होता. तुम्ही होता खरे परिस, तुमच्या संपर्कात, सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलं. तुमचा दिलखुलास अंदाज, मिश्किल स्वभाव प्रत्येक मंचावर आठवत राहील. आपल्याच कार्यकर्त्याला लव्ह यू म्हणताना, "अरे मला काय लव्ह यू म्हणतो, बायकोला म्हण." म्हणजे आधी कुटुंबाकडे बघ, गावाकडे बघ, हे सांगणारा माणूस आता राहिला नाही दादा. तुमची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही. हे अगदी खरं आहे."
"दादा, तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही. खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैवंच असेल, आपल्या महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच निघून जनतेला पोरकं करून गेली. माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर.आर. पाटील साहेब, प्रमोद महाजन साहेब आणि आता तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावलेत."
रितेश शेवटी म्हणाला, "दादा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हा सगळ्यांकडे बघून नक्की म्हणत असाल, "अरे रडताय काय, कामाला लागा." दादा, तुम्ही कालही प्रेरणा होता, आजही प्रेरणा आहात, उद्याही प्रेरणा असाल आणि हीच प्रेरणा घेऊन मीही कामाला लागतोय आणि आपला हा शो सुरू करतोय, तुमचा चाहता रितेश विलासराव देशमुख."
