'अर्हत प्रॉडक्शन मुंबई' या चित्रपट निर्मिती संस्थेचे धनंजय साबळे आणि नितीन शिंदे यांच्या 'डियर पँथर'ची नामांकित चित्रपट महोत्सवात निवड होणं, ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. याशिवाय जर्मनीतील 'कोबानी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये देखील डिअर पँथरने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. या अगोदर हा लघुपट छत्रपती संभाजीनगर येथील दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'स्पेशल स्क्रिनिंग' या कॅटेगरीमध्ये दाखवला गेला आहे. त्याच बरोबर एप्रिल महिन्यात चेन्नई येथे झालेल्या 'पीके रोझी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सुद्धा या लघुपटाचं कौतुक झालं होतं. दक्षिणात्य दिग्दर्शक पा. रणजिथ यांनी डिअर पँथरचं कौतुक केलं होतं.
advertisement
'सांगा आम्ही शाळेत कसं जायचं?' थर्माकॉलवर बसून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
मुंबईतील उच्चशिक्षित कामगारांवर आधारित
चित्रपटाचा नायक 'पँथर' हा एक पीएचडी धारक विद्यार्थी आहे. तो घरासाठी स्थानिक महानगरपालिकेशी हक्काची लढाई लढतो. लेखक-दिग्दर्शक धनंजय साबळे यांनी 'पँथर' हे नाव सरकारी अन्यायाविरुद्ध व्यापक लढ्याचे प्रतिक म्हणून वापरलेलं आहे. महानगरपालिकेत आपल्या वडिलांच्या जागेवर चतुर्थश्रेणी पदावर काम करणारा पँथर हा युवक सरकारकडे आपल्या हक्काच्या घरासाठी वारंवार मागण्या करतो. पण, त्याच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. दुसरीकडे, सीए होण्याचं स्वप्न बाळगणारी चाळीत राहणारी एक विद्यार्थिनी नाईलाजाने सफाई कर्मचारी म्हणून कामाला सुरुवात करते. इतकी वर्षे काम करून सुद्धा एकाही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला आपलं हक्काचं घर मिळालेलं नाही. सरकारकडून आरोग्य सेवेचा हवा तसा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत पँथर कसा संघर्ष करतो, ही बाब या लघुपटात दाखवण्यात आली आहे. याला लोकनाथ यशवंत यांनी 'साखळी' कवितेतून मांडलेला संघर्ष आणि वास्तवाची जोड देण्यात आली आहे.
अशी सूचली संकल्पना
धनंजय साबळे म्हणाले, "एकदा मोबाईल स्क्रोल करत असताना, 'चेंबूर-गोवंडी भागत ड्रेनेजमध्ये पडून दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू' अशा मथळ्याची बातमी धनंजय यांनी दिसली. त्याच वेळी चंद्रयान लाँच होण्याची देखील लगबग होती. डोक्यात विचार आला की, एकीकडे चंद्रयानचं प्रक्षेपण करून भारत प्रगती पथाकडे जातोय आणि दुसरीकडे जमिनीवरचे प्रश्न सोडवण्यात अजूनही दिरंगाई होत आहे. यातूनच लघुपट करण्याचा विचार मनात आला."
डिअर पँथरची निर्मिती अर्हत प्रॉडक्शनने केली असून छायाचित्रण अजय सागर यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत प्रतिक बोरसे यांचं असून व्हीएफएक्स निर्माता स्वप्नील सरगडे आहेत. आर्ट विभागाची जबाबदारी गौरव ओव्हळ, रोहित मोरे, हेमंत वाल्वी यांनी तर एडिटिंग शोनाली ढाकणे साबळे आणि आकाश मोरे यांनी केलं आहे. पोस्टर आणि जनसंपर्काची जबाबदारी जय कुंभारे, अथर्व बारापत्रे यांनी घेतलेली आहे. आराध्या अमित जाधव, शौर्या संदेश कदम हे बालकलाकार देखील चित्रपटात आहेत. याशिवाय समस्त बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. 128, कासारवाडी, दादर, मुंबई यांचे सहकार्य लाभले आहे.






