आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसून, ते अनुभव, आठवणी, संस्कार आणि न बोललेल्या भावनांनी विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट बांधलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा हा सिनेमा हे.
एका घरातल्या तीन स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक तिघीच्या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील दुरावा, न बोललेल्या भावना, तणाव, आठवणी आणि तरीही त्या सगळ्याच्या पलीकडे असलेले प्रेम हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने टीझरमध्ये मांडण्यात आलं आहे. कोणताही भडकपणा न करता, शांततेतून उलगडणाऱ्या भावनांचा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.
advertisement
'आईचं घर. हजार आठवणी.' अशी टॅगलाईन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आठवणींनी भरलेलं घर आणि त्या घरातल्या 'तिघीं'चं अंतर्मन हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. घर हे केवळ वास्तू नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न बोललेले संवाद आणि मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या भावना यांचं प्रतिबिंब ठरतं आणि हेच ‘तिघी’ ठळकपणे मांडतो.
या सिनेमात अभिनेत्री भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. आई मुलींच्या नात्याकडे वेगळ्या, प्रगल्भ आणि संवेदनशील नजरेतून पाहाणारा 'तिघी' हा सिनेमा येत्या 6 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
