६० लाख शेतकऱ्यांना झाला फायदा!
नाना पाटेकर म्हणाले की, ‘नाम फाऊंडेशन’ला १० वर्षं पूर्ण झाल्याचा त्यांना खूप आनंद आहे. ते म्हणाले, “माझ्यापेक्षा मकरंद गावगाड्यात खूप फेमस आहे. त्याची गावाशी नाळ जोडलेली आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली.”
नानांनी सांगितलं की, ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून आतापर्यंत ६० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी खूप कामं झाली आहेत आणि हे फाऊंडेशन म्हणजे 'माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ' आहे, असं ते म्हणाले.
advertisement
आम्हाला श्रेयवाद नको!
राजकारणाबद्दल बोलताना नानांनी स्पष्ट केलं की, त्यांना कोणताही श्रेयवाद नको आहे. ते म्हणाले, “राजकीय व्यक्ती काय म्हणतात, यापेक्षा आपण कामाला महत्त्व दिलं पाहिजे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही.” शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दलही त्यांनी ठोस भूमिका घेतली. “शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे,” असं त्यांनी सांगितलं.
याच कार्यक्रमात नाना पाटेकरांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही आपलं वैयक्तिक मत मांडलं. ते म्हणाले, “माझ्या मते, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळूच नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे त्यांच्याशी का खेळावं? सरकारचं धोरण काय असावं माहिती नाही.” यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले.